युद्ध घराजवळ आले; अजूनही आपण गप्प का?
युद्ध घराजवळ आले;
अजूनही आपण गप्प का?
राहुल गांधी यांची पंतप्रधान मोदी यांना विचारणा
सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली, ता. ५ ः अमेरिकी पाणबुडीने श्रीलंकेजवळ ‘आयरिस देना’ नावाचे इराणी लढाऊ जहाज बुडवले होते, त्याचा संदर्भ देत युद्ध घरापर्यंत आले, तरीही अजूनपर्यंत आपण गप्प का? अशी विचारणा काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. ‘‘अमेरिका आणि इराण यांच्यातले भीषण युद्ध भारताच्या जवळ येऊन पोहोचले आहे, तरीही मोदी यांनी मौन बाळगले आहे,’’ असा आरोप राहुल यांनी समाज माध्यमातून केला आहे.
‘‘सध्या जगात मोठ्या उलथापालथी सुरू आहेत. समुद्री तुफान समोर आहे. देशाकडून आयात होणाऱ्या एकूण इंधनापैकी ४० टक्के इंधनाचा पुरवठा होर्मुझ सामुद्रधुनीतून होतो. इराणने ही सामुद्रधुनी बंद केल्यामुळे इंधनपुरवठा धोक्यात निर्माण झाला आहे. ‘एलपीजी’ आणि ‘एलएनजी’ वायूच्या बाबतीत तर स्थिती आणखी खराब आहे. अशावेळी भारताकडे तडजोड करणारे पंतप्रधान आहेत. या पंतप्रधानांनी आपल्या धोरणात्मक सार्वभौमत्वाचे आत्मसमर्पण केले आहे,’’ अशी टीका राहुल यांनी केली आहे.
सरकार घाबरट ः रमेश
‘‘अमेरिकेने श्रीलंकेजवळ जी कृती केली आहे, तिचे भारतावर अनेक दृष्टीने परिणाम होणार आहेत. विशेष म्हणजे अद्यापपर्यंत भारताने या घटनेवर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. अमेरिका-इस्राईल यांच्याकडून इराणच्या सर्वोच्च नेत्याची हत्या करण्यात आली होती. त्यावर भारताने प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यामुळे जहाज बुडवल्याच्या घटनेवर प्रतिक्रिया न दिल्याचे आम्हाला कोणतेही आश्चर्य वाटलेले नाही. इतके घाबरट सरकार आम्ही कधीही पाहिले नव्हते,’’ अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस जयराम रमेश यांनी केली आहे.
‘संवेदनशीलतेकडे दुर्लक्ष’
‘‘भारताच्या निमंत्रणावरुन ‘आयरिस देना’ या लढाऊ जहाजाने युद्धाभ्यासात सहभाग घेतला होता. अशावेळी अमेरिकेने या जहाजावर हल्ला करत भारताच्या संवेदनशीलतेकडे दुर्लक्ष केले आहे,’’ अशी प्रतिक्रिया माजी परराष्ट्र सचिव कंवल सिब्बल यांनी दिली आहे. अशा अभ्यासावेळी जहाजांवर दारूगोळा नसतो. युद्धाभ्यासात इराणचे जहाज सामील असल्याची माहिती अमेरिकेला होती. त्यामुळे कट रचत अमेरिकेने हे जहाज बुडवल्याचे स्पष्ट होते, असे सिब्बल म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

