मोदी सर, मला "IAS ' व्हायचंय ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Modi Sir I want to be an IAS

मोदी सर, मला "IAS ' व्हायचंय !

पुणे : कोथरुडच्या पुणे अंध मुलीच्या शाळेतील अवघ्या 12 वर्षांच्या श्रेयाच्या आयुष्यातील मेट्रोचा हा पहिलाच प्रवास. या पहिल्याच प्रवासात तिचे सहप्रवासी होते, दस्तुरखुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी. मोदी यांनी श्रेयाला "तुला मोठेपणी काय व्हायचे आहे' असा प्रश्‍न विचारला आणि क्षणाचाही विलंब न करता, न घाबरता श्रेयाने उत्तर दिल, "सर मला "आयएएस' व्हायचंय'. दृष्टीहीन श्रेयाचे ते उद्‌गार ऐकून पंतप्रधान मोदी हे देखील भारावले. केवळ तेवढेच नाही, तर त्यांनी तिच्या पाठीवर शाब्बासकीची थाप देत "मला तुझा अभिमान वाटतो' अशा शब्दात श्रेयाच्या स्वप्नांना सुवर्णशब्दांचे बळ दिले ! निमित्त होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे मेट्रो लोकार्पण सोहळा अन्‌ मेट्रो प्रवासाचे !

रविवारी सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे मेट्रोच्या लोकार्पण सोहळ्यापुर्वी रविवारी सकाळी साडे अकरा वाजण्याच्या सुमारास गरवारे कॉलेज ते आननंदनगर दरम्यान मेट्रोने प्रवास केला. यावेळी त्यांच्यासमवेत विमलाबाई गरवारे प्रशालेचे विद्यार्थी-विद्यार्थीनी, मॉडर्न महाविद्यालयाचे दिव्यांग विद्यार्थी गौरव मालक, सतीश एकनार व अनिकेत शिंदे हे विद्यार्थी होते. त्यांच्यासमवेतच कोथरुड येथील पुणे अंध मुलींच्या शाळेची विद्यार्थीनी श्रेया युवराज गाढवे हिने पंतप्रधान मोदी यांच्यासमवेत मेट्रोतुन प्रवास केला.

श्रेया पुणे अंध मुलींच्या शाळेची विद्यार्थीनी आहे. सध्या ती 12 वीमध्ये शिक्षण घेत असून तिची आई मयुरी गाढवे या गृहिणी आहेत. थेट पंतप्रधानांसमवेत मेट्रोतुन प्रवास करण्याच्या घटनेने श्रेया अक्षरशः भारावुन गेली होती. ""आजची घटना मी आयुष्यात कधीच विसरणार नाही. आपल्या देशाच्या पंतप्रधानांना एकदा भेटायचे, हे माझे स्वप्न होते. परंतु ते इतक्‍या लवकर शक्‍य होईल, असे वाटले नाही. परंतु, रविवारी तो क्षण माझ्या आयुष्यात आला. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत मेट्रोतुन प्रवास केला. त्यामुळे मेट्रोतुन प्रवास करण्याचा आणि पंतप्रधानांना भेटण्याचे माझे स्वप्न खऱ्या अर्थाने पुर्ण झाले.''

"श्रेया, तुला मोठेपणी काय बनायचे आहे', हा प्रश्‍न मला पंतप्रधान मोदी यांनी विचारल्यावर मी भारावुन गेले. हा अनुभव व्यक्त करताना श्रेया म्हणाली, "मोदी सरांना मी गाणे गाते हे सांगितले. त्यानंतर मला आपल्या देशाची सेवा करायची आहे, त्यासाठी मला "आयएएस' अधिकारी व्हायचे आहे, त्या माध्यमातून मला देशसेवा बजावयाची आहे.' माझे असे उत्तर ऐकूण मोदी सरांना खुप आनंद झाला. पंतप्रधान म्हणाले, ""मला देशाचे भविष्य तुमच्यासारख्या मुलांमध्ये दिसते आहे. तुझे आत्मविश्‍वास व स्वप्न पाहून मला तुझा अतिशय अभिमान वाटत आहे.'' अशा शब्दात त्यांनी श्रेयाच्या पाठीवर शाब्बासकीची थाप दिली.

"जे काही कराल, ते चांगले करा' असा दिला संदेश

""पंतप्रधान साहेबांनी मला माझे नाव विचारुन, भविष्यात तुम्हाला काय करायचे आहे, कुटुंबात कोण-कोण आहे, असे प्रश्‍न विचारले. त्यावेळी आम्हीही त्यांना आमच्या मनातील काही गोष्टी सांगितल्या. त्यावेळी त्यांनी मला "जे काही कराल, ते चांगले करा' असा संदेश दिला.'' रसिका शिखरे, इयत्ता 10 वी, विमलाबाई गरवारे प्रशाला.

"तुम्ही छान मराठी बोलता'

मॉडर्न महाविद्यालयाचे गौरव मालक, सतिश एकनार व अनिकेत शिंदे या तीन दिव्यांग विद्यार्थ्यांनीही पंतप्रधानांशी संवाद साधला. थेट पंतप्रधानांसमवेत मेट्रोतुन प्रवास करण्याची संधी मिळाल्याचा आनंद तिघांच्याही चेहऱ्यावर दिसत होता. इतर विद्यार्थ्यांप्रमाणेच पंतप्रधानांनी या तिघांनामही नावे, शिक्षण व भविष्यात काय बनायचे आहे, याची विचारणा केला. तेव्हा, अनिकेत शिंदे व एकनार या दोघांनी पंतप्रधानांना "तुम्ही खुप छान मराठी बोलतात, आम्हाला मराठी असल्याचा अभिमान वाटतो', अशा शब्दात संवाद साधला. त्यावेळी पंतप्रधानांनी हलकेसे स्मित करीत त्यांना प्रोत्साहन दिले.

Web Title: Modi Sir I Want To Be An Ias Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..