

67838
कोल्हापूर ः अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेतर्फे रविवारी ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना उद्योगमंत्री उदय सामंत आणि आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी शेजारी मिलिंद अष्टेकर, ज्योती जोशी, गिरीश महाजन.
-
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ४ : ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांची मराठीप्रति आत्मियता पाहता ते महाराष्ट्राचा अभिमान आहेत, सध्या ओटीटीवरील कलाकार एका रात्रीत मोठे होत आहेत. मात्र, रंगभूमी, चित्रपटसृष्टीत कष्टातून घडत योगदान देणाऱ्या जोशी यांचा आदर्श घ्यावा, असे आवाहन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले.
येथील देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे रंगमंदिरात अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेतर्फे ज्येष्ठ अभिनेते जोशी यांना मंत्री सामंत यांच्या हस्ते संगीतसूर्य केशवराव भोसले पुरस्कार प्रदान करण्यात आला. सन्मानचिन्ह, ५१ हजार रुपये, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप होते. यावेळी आमदार सतेज पाटील, ज्योती जोशी उपस्थित होते.
मोहन जोशी स्वाभिमानी कलाकार आहेत. त्यांना संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या नावाने पुरस्कार मिळणे हे रंगभूमीसाठी अभिमानास्पद आहे, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.
जोशी यांची करारी नजर आजही लक्षात आहे. संवाद किती मिनिटांचा असावा, शब्दफेक किती महत्त्वाची असते, हे त्यांच्याकडून शिकायला मिळाले. संगीतसूर्य केशवराव भोसले यांना अभिवादन त्यांच्या नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्कारासाठी जोशी यांची निवड योग्य असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
संगीतसूर्य केशवराव भोसले यांचे नाट्य, संगीत क्षेत्रांत मोलाचे योगदान आहे. त्यांच्या नावे दिला जाणारा हा पुरस्कार गेल्यावर्षी अशोक सराफ यांना मिळाला. त्यानंतर यावर्षी मला हा पुरस्कार मिळाला हे माझे भाग्य आहे. त्याचे समाधान वाटत असल्याची भावना मोहन जोशी यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमात दिलीप गुणे यांचा सत्कार मंत्री सामंत यांच्या हस्ते झाला. नाट्य परिषदेचे प्रमुख कार्यवाह गिरीश महाजन यांनी प्रास्ताविक केले.
नाट्य परिषदेचे अध्यक्ष मिलिंद अष्टेकर, जितेंद्र देशपांडे आदी उपस्थित होते. विश्वराज जोशी यांनी सूत्रसंचालन केले. धैर्यशील यादव यांनी आभार मानले. दरम्यान, जोशी आणि त्यांच्या पत्नी ज्योती यांची मुलाखतकार राजेश दामले यांनी प्रकट मुलाखत घेतली. त्यातून जोशी यांनी जीवनप्रवास उलगडला.
.....
नाट्य परिषदेला
दहा लाखांचा निधी
अखिल भारतीय नाट्य परिषदेचे कोल्हापूरच्या सांस्कृतिक चळवळीत मोठे योगदान आहे. डॉ. डी. वाय. पाटील यांच्या नावाने दहा लाखांचा निधी मुदतबंद ठेवीच्या माध्यमातून देणार असल्याचे आमदार सतेज पाटील यांनी जाहीर केले. त्याच्या व्याजातून नाट्य परिषदेच्या कोल्हापूर शाखेने कोल्हापूरचा सांस्कृतिक ठेवा, परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी विविध उपक्रम राबविण्याचे आवाहनही त्यांनी केले.
.....
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.