

PTD26A06939
पाथर्डी : पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढताना मोहरी ग्रामस्थ.
पाण्यासाठी मोहरी ग्रामस्थांचा हंडा मोर्चा
जलजीवन मिशनच्या कामाची चौकशी करण्याची मागणी; दोन दिवसांत टँकर सुरू न झाल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा
पाथर्डी, ता. ५ : तालुक्यातील मोहरी गावचा पाणीपुरवठा सुरळीत करावा, गावात झालेल्या जलजीवन मिशनच्या कामाची चौकशी करावी तसेच गेल्या दोन महिन्यांपासून बंद असलेली नळयोजना सुरू करावी, अशा विविध मागण्यांसाठी मोहरी ग्रामस्थांनी तहसील कार्यालय व पंचायत समिती कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. मोर्चात डोक्यावर रिकामे हंडे घेऊन महिला सहभागी झाल्या होत्या.
मोहरी गावची लोकसंख्या तीन हजार, तर जनावरांची संख्या जवळपास पाच हजार आहे. चालू वर्षी पावसाने पाठ फिरवल्याने गावातील विहिरी व बोअरवेल पूर्णपणे आटून गेल्या आहेत. त्यामुळे पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. प्रशासनाने अद्याप गावात टँकर सुरू न केल्याने ग्रामस्थांचे मोठे हाल होत आहेत.
या पार्श्वभूमीवर माजी सरपंच कल्पजीत डोईफोडे, उपसरपंच संजय नरोटे, संजय डोईफोडे, इरफान पठाण, अमोल नरोटे, देविचंद नरोटे, अशोक डोईफोडे, आदिनाथ डोईफोडे, सविता नरोटे, कल्याणी कदम, इंदुबाई मोहिते, तुळसा मोहिते, शांता मोहिते, शारदा डोईफोडे, राधा डोईफोडे, गीता डोईफोडे आदींनी मोर्चा काढला.
कल्पजीत डोईफोडे म्हणाले, ‘‘गावात तलाव आहे; मात्र या तलावातील पाण्याचा उपयोग गावाच्या संपूर्ण भागाला होत नाही. मोहरी परिसरातील शेतकरी, मेंढपाळ व नागरिक पाण्यासाठी त्रस्त आहेत. प्रशासनाने गावातील परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी करून कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे. महसूल प्रशासनाने गावाला टँकर मंजूर केला आहे; मात्र तो कधी सुरू करणार? दोन दिवसांत टँकर सुरू न झाल्यास पुन्हा आंदोलन करणार आहोत.’’ आंदोलकांनी जलजीवन मिशनच्या कामाची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली. प्रांताधिकारी प्रसाद मते व तहसीलदार डॉ. उद्धव नाईक यांनी मोहरी गावचा पाणीपुरवठा सुरळीत केला जाईल, असे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.