

MOH26B03723
मोहोळ ः पंचनामे करताना अधिकारी.
मोहोळमधील ४,८८१ खातेदारांचे ६,३१९ क्षेत्राचे पंचनामे पूर्ण
१०४ गावांची जबाबदारी तीन अधिकाऱ्यांवर; १२० क्षेत्रीय कर्मचारी नियुक्त
सकाळ वृत्तसेवा
मोहोळ, ता. २ : तालुक्यात दुष्काळामुळे नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे जलद अन् पारदर्शक पद्धतीने पूर्ण करून शेतकऱ्यांच्या अडचणींचे निवारण करण्यासाठी शहरासह १०४ गावांची जबाबदारी तीन अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. बाधित शेतकऱ्यांना लवकर मदत मिळावी, या दृष्टीने पंचनाम्याचे काम सुरू असून, शुक्रवार (ता. २)पर्यंत तालुक्यातील ४ हजार ८८१ खातेदारांच्या ६ हजार ३१९ क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत, अशी माहिती तहसीलदार सचिन मुळीक यांनी दिली.
तालुक्यातील खरीप हंगाम २०२६ मधील बाधित शेती पिकांच्या पंचनाम्याचा आदेश पारित करण्यात आला असून, प्रत्यक्ष पंचनामे मंगळवार (ता. २९ सप्टेंबर)पासून सुरू करण्यात आले आहेत. पंचनामा करण्यासाठी तालुक्यातील सर्व महसुली मंडळांतील प्रत्येक गावासाठी स्वतंत्र ग्रामस्तरीय पंचनामा समिती नेमण्यात आली आहे. या समितीत ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी अन् सहायक कृषी अधिकारी यांचा समावेश आहे. ही समिती प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन संयुक्त पंचनामा करणार आहे.
पंचनाम्यांसाठी तालुक्यात एकूण १२० क्षेत्रीय कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून, त्यात तलाठी, ग्रामसेवक अन् कृषी सहायकांचा समावेश आहे. शासन नियमानुसार नुकसान झालेल्या बाधित क्षेत्राचेच पंचनामे केले जाणार असून, हे पंचनामे केवळ खरीप पिकांचे केले जाणार आहेत.
तहसीलदार सचिन मुळीक, तालुका कृषी अधिकारी हर्षद निगडे अन् गटविकास अधिकारी तेजश्री गायकवाड यांच्या अधिपत्याखाली पंचनाम्याचे काम होणार आहे. एकही बाधित शेतकरी पंचनाम्यापासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश सर्व क्षेत्रीय अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
--
कागदपत्रे जोडणे आवश्यक
पंचनामा करताना शेतकऱ्यांनी सात-बारा, आठ-अ उतारा, आधारकार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स, ॲग्रीस्टॅक क्रमांक, सामाईक खाते असल्यास संमतीपत्र अन् समिती सदस्यांसह शेतात काढलेला जिओ-टॅगिंग फोटो जोडणे सक्तीचे आहे.
कोट
- पंचनाम्यांवर देखरेख अन् तपासणीसाठी मंडल अधिकारी, विस्तार अधिकारी अन् मंडल कृषी अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पंचनामे पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांची यादी तहसील कार्यालयात सादर करण्यासाठी प्रत्येक गावात क्षेत्रीय अधिकाऱ्याची विशेष नियुक्ती करण्यात आली आहे.
- सचिन मुळीक, तहसीलदार
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.