मोहोळ नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, राजकीय हालचाली वाढल्या

मोहोळ नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, राजकीय हालचाली वाढल्या

Published on

मोहोळच्या उपनगराध्यक्षपदाची
माळ कोणाच्या गळ्यात पडणार?
राजकीय हालचाली वाढल्या; उत्सुकता शिगेला
सकाळ वृत्तसेवा
मोहोळ, ता. ४ : संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतलेल्या व ‘हायव्होल्टेज’ नगरपरिषद म्हणून ओळख असलेल्या मोहोळ नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीची घटिका समीप आली आहे. उपनगराध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार? याची उत्सुकता शिगेला पोचली आहे.
अनेक इच्छुक नवनिर्वाचित नगरसेवक उपनगराध्यक्ष पदाच्या रांगेत उभे आहेत. मात्र, एवढे जरी असले तरी भाजपचे नेते तथा माजी आमदार राजन पाटील यांच्या विश्वासू सहकाऱ्याच्या गळ्यातच ही माळ पडणार, अशी चर्चा शहरात आहे. त्या पार्श्वभूमीवर इच्छुकांच्या ‘अनगर वाऱ्या’ वाढल्या आहेत. तर काही जणांनी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडून फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे.
जिल्ह्यात मोहोळ नगरपरिषदेची पंचवार्षिक निवडणूक अत्यंत अटीतटीच्या वातावरणात पार पडली. निवडणूक तब्बल नऊ वर्षांनंतर पार पडली. त्यात माजी आमदार राजन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे ११, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चरणराज चवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ८ तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा एक असे एकूण २० नगरसेवक निवडून आले आहेत. नगराध्यक्षाची निवड ही जनतेतून झाल्याने शिवसेनेच्या सिद्धी वस्त्रे या नगराध्यक्षपदावर विराजमान होणार आहेत.
दरम्यान, मोहोळ नगरपरिषदेत स्वीकृत नगरसेवक म्हणून दोघांना संधी मिळणार आहे. त्यासाठीही आपापल्या नेत्यांकडे संबंधितांनी फिल्डिंग लावल्याची चर्चा आहे. ते दोन भाग्यवान कोण? याचीही उत्सुकता शिगेला पोचली आहे.
दरम्यान, नूतन नगराध्यक्षांना पदभार घेण्याचे प्रशासनाचे आदेश आहेत. त्या पार्श्वभूमीवर नूतन नगराध्यक्षा सिद्धी वस्त्रे या सोमवारी (ता. ५) पदभार स्वीकारणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांकडून सांगण्यात आले.
---
चौकट
हे आहेत उपनगराध्यक्षपदाच्या शर्यतीत...
उपनगराध्यक्षपदाच्या शर्यतीत भाजपचे मंडल अध्यक्ष सतीश काळे, माजी आमदार राजन पाटील यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून समजले जाणारे कुंदन धोत्रे, नूतन नगरसेवक दत्ता खवळे, प्रमोद डोके, अझरुद्दीन कुरेशी तर महिलांमधून शहनाज तलफदार हे आहेत. दरम्यान, उपनगराध्यक्षाची निवड ही हात उंचावून मतदानाद्वारे होणार, की अगोदरच ठरवून केवळ प्रक्रिया पार पाडणे यातून होणार? याबाबत चर्चा रंगल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com