पेरू व डाळिंबासाठी लागणाऱ्या कृत्रिम टंचाई ,शेतकरी आर्थिक अडचणीत
MOH26B03318
मोहोळ : पेरूच्या झाडावरील पेरूंचे उन्हापासून संरक्षणासाठी बसविलेले फोम.
---
फळबागांसाठी लागणाऱ्या साहित्याची कृत्रिम टंचाई
मोहोळ तालुक्यात दरवाढीचा फटका; व्यापाऱ्यांची गोदामे तपासणीची मागणी
राजकुमार शहा : सकाळ वृत्तसेवा
मोहोळ, ता. १९ : मोहोळ तालुक्यातील पेरू, डाळिंब तसेच भाजीपाला पिकांसाठी आवश्यक असलेल्या प्लास्टिक कॅरीबॅग, प्रोटेक्शन कव्हर, फोम आदी साहित्याची व्यापाऱ्यांनी कृत्रिम टंचाई निर्माण केल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असून संबंधित व्यापाऱ्यांच्या गोदामांची तपासणी करून त्यांच्यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी फळे व भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
मोहोळ तालुक्यात पेरूचे सुमारे चार ते पाच हजार एकर, डाळिंब दहा हजार एकर आणि केळी चार हजार एकर क्षेत्र आहे. फळांचा दर्जा टिकवण्यासाठी पेरूसाठी फोम, डाळिंबासाठी कॅरिबॅग आणि केळीच्या घडासाठी संरक्षणात्मक कव्हर वापरले जाते. यामुळे फळांवर बाह्य वातावरणाचा परिणाम कमी होतो आणि बाजारात चांगला दर मिळण्यास मदत होते. मात्र, सध्या आखाती देशांतील युद्धाचे कारण देत फोम, कॅरिबॅग, हिरवे-पांढरे शेडनेट, कांद्याच्या पिशव्या आदी साहित्याची कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोप आहे. ‘कच्चा माल मिळत नाही’, ‘गॅस उपलब्ध नाही’ अशा कारणांमुळे शेतकऱ्यांना साहित्य मिळण्यात अडचणी येत आहेत. याच काळात कडक उन्हामुळे फळांची गळ वाढत असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
बाजारात आधीच फळांचे दर घसरलेले असताना, साहित्याच्या वाढलेल्या किमतींमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यामुळे शासनाच्या संबंधित विभागाने याची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांची लूट करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
---
कोट
MOH26B03317
सध्या उन्हाची तीव्रता वाढल्याने विहिरी व बोअरचे पाणी कमी झाले आहे. फळबागा टिकविण्याचे मोठे आव्हान आहे. अशा परिस्थितीत आवश्यक साहित्याची कृत्रिम टंचाई निर्माण करून शेतकऱ्यांना अधिक अडचणीत टाकले जात आहे. संबंधित व्यापाऱ्यांच्या गोदामांची तपासणी करून कडक कारवाई करावी.
- चेतन चौधरी, पेरू उत्पादक शेतकरी
---
चाैकट
फळबागांसाठी लागणाऱ्या साहित्याचे पूर्वीचे दर (कंसात आताचे दर)
- फोम : ५५ पैसे प्रतिनग (आता ९० पैसे)
- कॅरिबॅग : ११५ रुपये प्रतिकिलो (आता २१० रुपये)
- शेडनेट : १३० रुपये प्रतिकिलो (आता १८० रुपये)
- भाजीपाला पॅकिंग कॅरिबॅग : १६० रुपये प्रतिकिलो (आता २३० रुपये)
- कांदा लाल पिशवी : ७ रुपये नग (आता २० रुपये)

