

लोगो : मोहोळ पंचायत समिती
---
पार्वती गावडे की असलम चौधरी यांना संधी?
सभापती निवडीसाठी राजकीय हालचालींना वेग; भाजपचे वर्चस्व
राजकुमार शहा : सकाळ वृत्तसेवा
मोहोळ, ता. १० : मोहोळ तालुका पंचायत समितीच्या सभापती व उपसभापती निवडीसाठी राजकीय हालचालींना वेग आला असून, सभापती पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. यंदा सभापती पद इतर मागास प्रवर्गासाठी आरक्षित असून, पंचायत समितीवर माजी आमदार राजन पाटील यांचे वर्चस्व कायम आहे. त्यात पार्वती गावडे की असलम चौधरी यांच्यापैकी कोणाला संधी मिळते, याकडे लक्ष लागले आहे.
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांत मोहोळ पंचायत समितीच्या १२ जागांपैकी ७ जागांवर भाजप, ३ जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस, १ जागेवर शिवसेना तर १ जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार विजयी झाला आहे. पंचायत समितीमार्फत विविध विकास योजना राबवल्या जात असल्याने या सत्तास्थानावर नियंत्रण मिळवण्यासाठी राजकीय हालचाली वाढल्या आहेत.
सभापती पदासाठी भाजपचे असलम चौधरी (घोडेश्वर गण) व पार्वती गावडे (सावळेश्वर गण), राष्ट्रवादीचे धनाजी माळी (कुरुल गट) आणि शिंदे सेनेच्या संगीता वसेकर (पेनूर गट) यांची नावे चर्चेत आहेत. शासनाच्या नव्या नियमानुसार यंदा दोन स्वीकृत सदस्यांची भर पडणार असून, त्यामुळे सदस्य संख्या १४ होणार आहे. निवडून आलेल्या सदस्यांपैकी अनेक जण नवखे असल्याने समीकरणे अधिकच उत्सुकता वाढवणारी ठरली आहेत.
भाजपकडे सात सदस्य असल्याने सभापती भाजपचाच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पार्वती गावडे की असलम चौधरी यांना संधी मिळणार, याची उत्सुकता वाढली आहे. स्वीकृत सदस्यासाठी पापरी येथील भाजपचे सतीश भोसले यांचे नाव आघाडीवर असून, त्यांनी खंडाळी गणातून निवडणूक लढवली होती.
---
उपसभापती पदासाठीही चुरस
सभापती पद आरक्षित असले तरी उपसभापती पदासाठी आरक्षण नसल्याने त्या पदासाठीही चुरस वाढली आहे. माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने आणि राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.