मंजूर असलेले कामे प्रलंबित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करा, जनहित चे प्रभाकर देशमुख यांची मागणी
कामे प्रलंबित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी
मोहोळ, ता. १७ ः तीन वर्षांपूर्वी मंजूर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे.
देशमुख यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पेनूर-येवती-हिवरे या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम तीन वर्षांपूर्वी मंजूर आहे. मात्र कामचुकार अधिकाऱ्याच्या व ठेकेदाराच्या आरेरावीमुळे हे काम प्रलंबित राहिले आहे. हा रस्ता रहदारीसाठी मोठ्या प्रमाणात वापरला जातो. त्यामुळे या रस्त्यावर अनेक छोटेमोठे अपघात होऊन अनेक जण जखमी झाले आहेत. तरी काम चुकारपणा करणाऱ्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करून ठेकेदाराला काळया यादीत टाकण्याची मागणी देशमुख यांनी केली आहे.
पाटकुल फाटा ते टाकळी सिकंदर चौक या मुख्य रस्त्यावरही मोठे खड्डे पडले असून, याचा वाहन चालकांना नाहक त्रास होत आहे. या रस्त्यावरील खड्डे त्वरित बुजवावेत. कोन्हेरी ते वडाचीवाडी या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम तीन वर्षापासून मंजूर आहे. मात्र ते कामही अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे रखडले आहे. वडवळ, गोटेवाडी ते कातेवाडी या रस्त्याच्या डांबरीकरणाचे कामही त्वरित करावे, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा प्रभाकर देशमुख यांनी दिला आहे.
यावेळी जनहित शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नाना मोरे, गणेश चवरे, मानाजी चवरे, किरण वसेकर, हनुमंत वसेकर, समाधान रणदिवे, गजेंद्र भोसले, नवनाथ सातपुते उपस्थित होते.
जनहित शेतकरी संघटनेच्या आंदोलनाची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने संबंधित कामाच्या ठेकेदारांना नोटिसा बजावल्या आहेत. कार्यारंभ आदेश मिळूनही कामात दिरंगाई केल्याबद्दल कारवाई करण्याचा इशारा या नोटीसीद्वारे दिला असून संबंधित कामे तात्काळ सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

