मोहोळ नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा संपन्न, भाजपच्या नगरसेवकाने केला नगराध्यक्षाचा निषेध

मोहोळ नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा संपन्न, भाजपच्या नगरसेवकाने केला नगराध्यक्षाचा निषेध

Published on

MOH२६B०३२८३ ः सिद्धी वस्त्रे

शंभूराजेंचा पुतळा उभारण्याचा ठराव मंजूर
मोहोळ नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा; नमो उद्यान योजनेतून साकारणार बागा

सकाळ वृत्तसेवा
मोहोळ, ता. २७ ः मोहोळ नगरपरिषदेची सर्वसाधारण सभा आज (शुक्रवार, ता. २७) नगराध्यक्ष सिद्धी वस्त्रे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यासाठी ठराव मंजूर करण्यात आला. दरम्यान, भाजपच्या नगरसेवकांनी शहराच्या विकासासाठीचे अनेक मुद्दे मांडले. मात्र, त्यातील एकही मुद्दा विषय पत्रिकेवर न घेतल्याने नगरसेवक कुंदन धोत्रे यांनी नगराध्यक्ष सिद्धी वस्त्रे यांचा निषेध व्यक्त केला.
आजच्या सभेत चर्चेसाठी आठ विषय अजेंड्यावर होते. त्यापैकी मोहोळ शहरातील जिल्हा परिषदेच्या शाळा नगरपरिषदेकडे वर्ग करण्याचा ठराव चर्चेला आला. त्यावेळी नगरसेवक कुंदन धोत्रे यांनी जिल्हा परिषदेच्या शाळा नगरपरिषदेकडे वर्ग करून घेतल्या तर त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठीचा खर्च तसेच त्या-त्या शाळेतील शिक्षकांच्या पगारीचा आर्थिक भार नगरपरिषदेला सोसवेल काय? असा मुद्दा उपस्थित केला. मोहोळ शहरासाठी योगदान देणाऱ्या देशभक्त स्व. संभाजीराव गरड, स्व. वसंतराव गरड, स्व. ए आर डी शेख, स्व. सुभाष देशमुख यांचा नगरपरिषदेला विसर पडला आहे, असा मुद्दा भाजपचे नगरसेवक सतीश काळे यांनी उपस्थित केला. त्यावर त्या विषयाचा ठराव करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. तसेच स्व. पंडित देशमुख यांचाही पुतळा बसविण्याबाबत चर्चा करण्यात आली. रस्त्याच्या मधोमध असणारे खांब बाजूला घ्यावेत. तसेच सध्या त्यावर फलक लावले जातात. त्याचा रहदारीला अडथळा होतो व सर्वसामान्याला त्रास होतो ते बंद झाले पाहिजे, असाही मुद्दा काळे यांनी उपस्थित केला. नगरपरिषदेच्या इमारतीसाठीची जागा ही निश्चित करण्यात यावी, असाही मुद्दा काळे यांनी मांडला.
भाजपचे नगरसेवक कुंदन धोत्रे यांच्यासह अन्य भाजपच्या नगरसेवकांनी सभेत शहराच्या विकासाचे अनेक विषय मांडले व ते विषय पत्रिकेवर घ्या, अशी मागणी केली. मात्र एकही विषय पत्रिकेवर घेतला नाही. दरम्यान, शिवाजी चौक ते गवत्या मारुती चौक या रस्त्याचा ठराव यापूर्वीच झाला आहे. मात्र, तो ठराव पुन्हा आज मंजुरीसाठी ठेवला. मग आमचेही विषय मंजुरीसाठी घ्या, असा आग्रह नगरसेवक धोत्रे यांनी धरला. त्यावरून गोंधळ झाला व नगराध्यक्ष वस्त्रे यांचा धोत्रे यांनी निषेध व्यक्त केला. मात्र, काही नगरसेवकांनी सारवासारव केल्यानंतर सभेच्या कामकाजाला पुन्हा सुरवात झाली. यावेळी सर्व नगरसेवक, मुख्याधिकारी डॉ. योगेश डोके, सभा विभाग प्रमुख प्रियांका गोरे, पाणीपुरवठा विभागाचे अभियंता अमित लोमटे, बांधकाम विभागाचे गणेश बागल, नगररचना विभागाचे कुणाल मोरे, लिपिक दिलीप जाधव आदी उपस्थित होते.

चौकट...
१०४ कोटी ९८ लाखांच्या बजेटला मंजुरी
मोहोळ नगरपरिषदेच्या २०२६-२७ च्या १०४ कोटी ९८ लाख ४० हजार रुपयाच्या अंदाजपत्रकास गुरुवारी (ता. २६) झालेल्या अर्थसंल्पीय बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. त्यातून भुयारी गटार, पाणीपुरवठा योजना, इमारत बांधकाम मंजुरी, अग्निशामक गाडी ही कामे प्राधान्याने होणार आहेत. तर चालू वर्षी नमो उद्यान योजना मंजूर झाली असून त्या माध्यमातून शहरात उत्तम बागा साकारणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com