मोहोळ बस स्थानक परिसरात तणावपूर्ण शांतता, पोलीस प्रशासनाचे शांततेचे आवाहन
फोटो : MOH26B03271
मोहोळ : येथे बस स्थानक परिसरात पुतळ्याजवळ झालेली गर्दी.
मोहोळ बसस्थानक परिसरात अज्ञाताने
बसविला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा
परिसरात तणावपूर्ण शांतता राखण्याचे पोलिसांचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
मोहोळ, ता. २२ : मोहोळ शहरातील बसस्थानक परिसरात शनिवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी छत्रपती संभाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा बसविल्याने शहरात तणावसदृश्य परिस्थिती निर्माण झाली. या पुतळ्यास परवानगी घेण्यात आली आहे का? याची खातरजमा प्रशासनाकडून सुरू असून नागरिकांनी शांतता राखून पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर व पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी केले आहे.
पोलिस प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, बसस्थानक परिसरात शनिवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा बसविला. रविवारी सकाळी पुतळा बसविण्यात आलेल्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. तसेच पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आल्याने परिसरात तणावसदृश्य वातावरण निर्माण झाले होते.
दरम्यान, उपविभागीय पोलिस अधिकारी संकेत देवळेकर व पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांनी घटनास्थळी भेट दिली. त्यानंतर शहरातील विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नागरिक, तहसीलदार सचिन मुळीक तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात आली. या बैठकीत संबंधित जागेची मालकी निश्चित करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला पत्र देण्यात आले असून, त्या ठिकाणी पुतळा बसविण्यास परवानगी देण्यात आली होती का याची माहितीही मागविण्यात आली आहे.
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पुतळा बसविण्यात आलेल्या ठिकाणी राज्य राखीव पोलिस दलाच्या दोन तुकड्या, शीघ्रकृती दलाची एक तुकडी, सात पोलिस अधिकारी व सुमारे ५० पोलिस कर्मचारी असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या बैठकीस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे उपव्यवस्थापक मुकेश सिंग, साइट इंजिनिअर सचिन पवार आदी उपस्थित होते.
-------------------------------
कोट :
छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याच्या संदर्भात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना लेखी पत्र देण्यात आले आहे. पुतळा बसविण्यास परवानगी देण्यात आली होती का, तसेच पुढील कार्यवाहीबाबत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे.
- सचिन मुळीक, तहसीलदार, मोहोळ
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

