

लोगो : मोहोळ तालुका
---
पं.स. गणांत नेतेमंडळींच्या राजकीय खेळ्या यशस्वी
१२ गणांत नवख्या सदस्यांचे वर्चस्व; ओबीसी आरक्षित सभापतिपदासाठी चुरस
राजकुमार शहा : सकाळ वृत्तसेवा
मोहोळ, ता. १० : मोहोळ तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या असून, पंचायत समितीवर नव्या चेहऱ्यांचे वर्चस्व निर्माण झाले आहे. ग्रामपंचायतीप्रमाणेच तालुका स्तरावर पंचायत समितीला विशेष महत्त्व असून, रस्ते, पाणीपुरवठा तसेच विविध शासकीय योजनांची अंमलबजावणी पंचायत समितीमार्फत केली जाते. त्यामुळे निवडून आलेल्या सदस्यांवर गाव व गणाच्या विकासाची मोठी जबाबदारी आहे.
मोहोळ तालुक्यात आष्टी, खंडाळी, नरखेड, शिरापूर, सावळेश्वर, कामती बुद्रूक, सय्यद वरवडे, पोखरापूर, पेनूर, टाकळी सिकंदर, कुरुल व घोडेश्वर असे एकूण १२ पंचायत समिती गण आहेत. यापैकी खंडाळी, शिरापूर व सय्यद वरवडे हे गण वगळता उर्वरित गणांभोवती आजपर्यंत विकास केंद्रित झाल्याचे चित्र आहे. सक्रिय पंचायत समिती सदस्यच विविध विकास योजना गावापर्यंत पोचवू शकतो, हे या निवडणुकीत पुन्हा अधोरेखित झाले आहे.
पंचायत समितीवर माजी आमदार राजन पाटील यांचे वर्चस्व कायम राहिले असून, तालुक्यातील विकासासाठी त्यांच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त आहे. आष्टी पंचायत समिती गणातून डॉ. अमित व्यवहारे यांना मतदारांनी संधी दिली असून, विकासाभिमुख नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. डॉ. व्यवहारे तसेच खंडाळी गणातील नूतन सदस्य गणेश मुळे हे जिल्हा परिषद सदस्य विजयराज डोंगरे यांचे समर्थक असून, या भागात डोंगरे यांचा राजकीय डाव यशस्वी ठरल्याचे मानले जात आहे.
नरखेड जिल्हा परिषद गटातून भाजपच्या उल्का पाटील विजयी झाल्या असून, त्या ठिकाणी राजन पाटील यांची खेळी यशस्वी ठरली. सावळेश्वर व कामती बुद्रूक हे पंचायत समिती गण ‘सभापती गण’ म्हणून ओळखले जात असून, सावळेश्वरमधून पार्वती गावडे तर कामती बुद्रूकमधून कोमल आवताडे निवडून आल्या आहेत. सभापतिपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव असल्याने या दोघी प्रमुख दावेदार मानल्या जात आहेत.
सभापतिपद महिलेकडे गेल्यास उपसभापतिपदासाठी घोडेश्वर गणातून भाजपचे असलम चौधरी हे दावेदार ठरू शकतात. एकूणच, प्रत्येक गणात स्थानिक नेत्यांनी भविष्यातील राजकारणाचा विचार करून डावपेच रचले असून, काहींना यश तर काहींना अपयश आले आहे. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे, अनेक ठिकाणी झालेल्या क्रॉस व्होटिंगमुळे मतदार अधिक जागरूक व सावध झाल्याचे चित्र आहे.
---
चौकट
पं.स गणातील पक्षीय बलाबल :
- भाजप - ७
- राष्ट्रवादी काँग्रेस - ३
- शिवसेना - १
- राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष - १
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.