esakal | पुणे पोलिसांकडून नऊ महिन्यांत ३३ गुन्हेगारी टोळ्यांवर 'मोका' ची कारवाई
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

नऊ महिन्यांत ३३ गुन्हेगारी टोळ्यांवर 'मोका' ची कारवाई

sakal_logo
By
पांडुरंग सरोदे@spandurangSakal

पुणे - म्होरके कारागृहातून सुटल्यानंतर दहशत निर्माण करू पाहणाऱ्या बहुतांश गुन्हेगारी टोळ्यांवर (Criminal Gang) पुणे पोलिसांनी (Pune Police) महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्याचा (मोका) (Mokka) बडगा उगारला. अवघ्या नऊ महिन्यांत पोलिसांनी ३३ टोळ्यांवर कारवाई (Crime) केली. यामुळे संघटित गुन्हेगारी टोळ्यांसह सराईत गुन्हेगारांमध्ये जरब निर्माण झाली आहे. (Mokka Crime on 33 Criminal Gang by Pune Police)

कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये गेल्या वर्षी जून महिन्यानंतर म्होरके कारागृहातून बाहेर येण्याची चिन्हे दिसू लागल्याने शहरात सराईत गुन्हेगार पुन्हा डोके वर काढू लागले. यामुळे आर्थिक फसवणुकीसह व खंडणीची प्रकरणे पुढे येऊ लागली. पोलिस आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अमिताभ गुप्ता यांनी या प्रकारांची गांभीर्याने दखल घेतली. त्यानुसार गुन्हेगारी टोळ्यांची इत्थंभूत माहिती जमा करून पोलिसांनी कारवाईला सुरूवात केली. सप्टेंबरपासून सराईत गुन्हेगारांभोवती ‘मोक्का’चा फास आवळण्यास सुरूवात झाली. त्यानंतर ७ जून २०२१ पर्यंत एकापाठोपाठ एक अशा ३३ टोळ्यांवर कारवाई झाली. त्यामुळे शहरातील संघटित गुन्हेगारीवर पोलिसांना पुन्हा एकदा नियंत्रण मिळविणे शक्‍य झाले.

बऱ्हाटे टोळीपासून कारवाईला धार

माहिती अधिकार कार्यकर्ता रवींद्र बऱ्हाटे, निलंबित पोलिस शैलेश जगताप, पत्रकार देवेंद्र जैन, पत्रकार संजय भोकरे, निलंबित पोलिस परवेझ जमादार आणि त्यांच्या साथीदारांविरुद्ध गेल्या ऑक्‍टोबर महिन्यात मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. जीवे मारण्याची धमकी, खंडणी, फसवणूक यासह विविध गुन्हे दाखल झाल्यानंतर या टोळीवर दोनदा ‘मोक्का’ची कारवाई झाली. त्यानंतर या कारवाईला वेग आला.

मारणे, घायवळची रवानगी कारागृहात

तळोजा कारागृहातून सुटल्यानंतर मारणे टोळीचा म्होरक्या गजानन ऊर्फ गजा पंढरीनाथ मारणे (वय ४८, रा. कोथरूड) याची रॅली काढण्यात आली. या रॅलीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करून नागरिकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. यावर टीका झाल्यानंतर पोलिसांनी मारणेवर कारवाईचा फास आवळला. दरम्यान, ग्रामीण पोलिसांनी गजा मारणे, नीलेश घायवळ यांना पकडून पुणे पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी त्यांची रवानगी कारागृहात केली. तसेच गुंड शरद मोहोळ यास शहरात प्रवेश करण्यास मनाई केली आहे.

हेही वाचा: ऑनलाईनचा घोळ;तरुणाच्या लर्निंग लायसनवर तरुणीचा फोटो

कारवाई झालेल्या टोळ्या

बऱ्हाटे टोळी, आंदेकर टोळी, घरफोड्या करणारी दुधाणी टोळी, ओंकारसिंग टाक टोळी, तळजाई वसाहतीतील सूरज अडागळे टोळी, वानवडीतील सनी हिवाळे टोळी, येरवड्यातील आकाश कनचिले टोळी, सोनसाखळी चोर राजाभाऊ ऊर्फ राजुखेमु राठोड टोळी, धायरीतील रोशन लोखंडे टोळी, व्यापारी नाना पेठेतील सूरज ठोंबरे टोळी, मुंढवा गोळीबारातील सचिन पोटे टोळी, कोंढव्यातील मुनाफ पठाण टोळी, हडपसरमधील शुभम कामठे टोळी, गौरव पासलकर टोळी, महिलांचे दागिने हिसकाविणारी इराणी टोळी, मामा-भाचे टोळी, अस्लम शेख टोळी, जबरी चोरी घरफोडी करणारी टोळी, बिबवेवाडीतील दर्शन हळंदे टोळी.

गुन्हेगारी टोळ्यांसह सराईतांवर वचक निर्माण करण्यासाठी ‘मोका’चा प्रभावीपणे वापर केला जात आहे. सर्वसामान्य नागरिकांना गुन्हेगारांचा त्रास होऊ नये आणि शहरातील शांतता अबाधित राहावी, हा त्यामागील उद्देश आहे. याबरोबरच प्रतिबंधात्मक कारवाईवर देखील भर दिला जात आहे.

- अमिताभ गुप्ता, पोलिस आयुक्त, पुणे

loading image
go to top