

PNE26W59650
अहिल्यानगर ः मुळा धरणावरील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने महापालिका प्रशासन आणि महावितरणची बैठक पार पडली. यावेळी उपस्थित मान्यवर.
मुळा धरणावरील वीजपुरवठा सुरळीत करा
महापौरांसह उपमहापौरांच्या महावितरणला सूचना
अहिल्यानगर, ता.१७ ः मुळा धरण येथून अहिल्यानगर शहराला सुमारे ३० किलोमीटर अंतरावरून पाणीपुरवठा केला जातो. मात्र, गेल्या महिनाभरापासून मुळा धरण परिसरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. परिणामी, नागरिकांना पाण्यासाठी विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. नागरिकांचा रोष महापालिका प्रशासन आणि नगरसेवकांना सहन करावा लागत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन महापौर ज्योती गाडे, उपमहापौर ॲड. धनंजय जाधव आणि आयुक्त यशवंत डांगे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत खंडित होणारा वीजपुरवठा तातडीने सुरळीत करण्याची मागणी केली.
या बैठकीला गाडे, जाधव, डांगे यांच्यासह महिला व बालकल्याण समिती सभापती दीपाली बारस्कर, उपसभापती वर्षा सानप, उपायुक्त मेहेर लहारे, महावितरणचे कार्यकारी अभियंता योगेश चव्हाण आदी उपस्थित होते. महिनाभरापासून मुळा धरण परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडित होत आहे. एक ते १४ तारखेच्या कालावधीत सुमारे आठ वेळा वीजपुरवठा खंडित झाला. वीजपुरवठा पुन्हा सुरू झाल्यानंतरही पाणीपुरवठा पूर्ववत होण्यासाठी सुमारे तीन तासांचा कालावधी लागतो. त्यामुळे पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडून शहरातील विविध भागांना पाणी मिळण्यास विलंब होत आहे. विशेषतः केडगावसारख्या मोठ्या उपनगरात पाच ते सहा दिवसांनी पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. या परिस्थितीमुळे नागरिकांकडून नगरसेवक आणि महापालिका प्रशासनाविषयी नाराजी व्यक्त केली जात आहे. महापालिकेने वीजपुरवठ्याच्या समस्येबाबत महावितरण कार्यालयाशी वारंवार पत्रव्यवहार करूनही वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रकार सुरूच असल्याचे बैठकीत निदर्शनास आणून देण्यात आले.
इन्फो
भूमिगत वीजवाहिन्यांचा पर्याय
महावितरणचे चव्हाण म्हणाले, की मुळा धरण परिसरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी भूमिगत वीजवाहिन्या टाकून वीजपुरवठा करावा लागेल किंवा राहुरी परिसरातून १३२ केव्ही वीजवाहिनीवरून जोडणी घ्यावी लागेल. यासाठी राज्य शासनाकडे पाठपुरावा करणे आवश्यक आहे. वीजपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन त्यांनी दिले.
इन्फो
जोडणीचा नवीन प्रस्ताव करा
भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी महावितरण प्रशासनाने मुळा धरण येथे सबस्टेशन उभारण्यासाठी, तसेच १३२ केव्ही वीजवाहिनीवरून जोडणी घेण्यासाठी नवीन प्रस्ताव तयार करून राज्य शासनाकडे पाठवावा, अशी मागणी केली. हा प्रस्ताव मार्गी लागण्यासाठी आपण पाठपुरावा करू, असे त्यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.