पुण्यात कोरोनाचा वाढता धोका; PMPML प्रवाशांसाठी सोमवारपासून नवे नियम

सकाळ वृत्तसेवा
Friday, 19 February 2021

शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे महापालिकेकडील नोंदीतून स्पष्ट झाले आहे. कोरोना नियंत्रणाच्या विविध उपायांचा एक भाग म्हणून महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी पीएमपीला प्रवासी संख्येवर नियंत्रण आणण्यास संगितले.

पुणे : कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन बसमध्ये आसन क्षमते इतकेच प्रवासी सामावून घेण्याचा निर्णय पीएमपीने घेतला. येत्या सोमवारपासून (ता. २२) या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे बसमध्ये प्रवाशांना उभे राहून प्रवास करता येणार नाही. शहरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे महापालिकेकडील नोंदीतून स्पष्ट झाले आहे. कोरोना नियंत्रणाच्या विविध उपायांचा एक भाग म्हणून महापालिका आयुक्त विक्रमकुमार यांनी पीएमपीला प्रवासी संख्येवर नियंत्रण आणण्यास संगितले. त्यानुसार शनिवारपासून प्रवासी संख्येवर नियंत्रण आणण्याचे आदेश पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवसथापकीय संचालक राजेंद्र जगताप यांनी अधिकाऱयांना दिला आहे. सोमवारपासून या निर्णयाची काटेकोर अंमलबजावणी करण्यासही त्यांनी संगितले आहे.

पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा 

बसची सरासरी आसन क्षमता ३२ ते ३४ आहे. तेवढचे प्रवासी बसमध्ये घ्यावेत, अशा सूचना वाहक-चालकांना देण्यात आल्या आहेत. तसेच मास्कशिवाय बसमध्ये प्रवाशांना प्रवेश दिला जाणार नाही. तसेच बसमध्ये सॅनिटायझरच्या बाटल्या सुस्थितीत असतील, याचीही खबरदारी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बसमधील प्रवासी संख्या कमी केल्यामुळे गर्दीच्या वेळात प्रमुख मार्गांवर सोमवारपासून ५० बस वाढविण्यात येणार आहेत. तसेच गरज भासल्यास आणखी २० बस वाढविण्यात येतील, असेही जगताप यांनी सांगितले.

पीएमपीच्या दोन्ही शहरांत सध्या सुमारे १५३२ बस ३०० मार्गांवर धावत आहेत. त्यातून दररोज साडेसात लाख प्रवासी प्रवास करीत आहेत. सुमारे एक कोटी २५ लाख रुपये रोजचे उत्पन्न येत आहे. दोन्ही महापालिकांच्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱयांची वाहतूक करण्यासाठी पीएमपीच्या सध्या १० बस सुरू आहेत. तसेच कोरोना ड्यूटीसाठी दोन्ही महापालिकांत सुमारे १७५ वाहक-चालक तैनात करण्यात आले आहेत.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

कोरोनाच्या लॉकडाउनमुळे पीएमपीची वाहतूक सेवा गेल्या वर्षी २७ मार्च रोजी बंद करण्यात आली होती. त्यानंतर सात महिन्यांनी म्हणजेच ४ सप्टेंबरपासून पीएमपीची सेवा सुरू झाली होती. कोरोनापूर्व काळात पीएमपीमधून दररोज सुमारे ११ लाख प्रवासी प्रवास करीत. त्यातून रोज किमान दीड कोटी रुपयांचे उत्पन्न मिळत होते. या पार्श्वभूमीवर पीएमपीची प्रवासी वाहतूक सेवा सुरळीत होत असताना आता पीएमपीवर पुन्हा निर्बंध आले आहेत.

 
कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. त्यामुळे पुणे महापालिकेने केलेल्या विनंतीनुसार बसमध्ये उभे राहून प्रवास करणाऱया प्रवाशांवर सोमवारपासून बंदी घालण्यात आली आहे. बसच्या आसन क्षमतेइतक्या प्रवाशांना बसमध्ये प्रवेश देण्यात येणार आहे. या निर्बंधांमुळे जादा बस सोडाव्या लागतील. त्यासाठीची तयारी सध्या सुरू करण्यात आली आहे.’’
- राजेंद्र जगताप (अध्यक्ष, पीएमपी) 
आणखी वाचा - पुण्यातली कॉलेज पुन्हा बंद होणार? 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: From Monday Ban on standing passenger in PMPML bus in pune Corona