परिस्थितीशी दोन हात करत पुण्यातील मोनिका बनली उपशिक्षण अधिकारी

अजित घस्ते
Sunday, 21 June 2020

स्पर्धा परीक्षेमध्ये पर्वती दर्शन येथील मोनिका कांबळेची हॅट्रिक

सहकारनगर (पुणे) : परिस्थिती माणसाला संघर्ष करायला शिकवते आणि संघर्षातून धैर्याने पुढे जाताना जीवनाचे अनेक स्थित्यंतर घडत असतात. अशाच परिस्थितीत दहा बाय दहाच्या घरात वस्तीमध्ये राहून वडील सफाई कर्मचारी असताना मोनिका कांबळे हिने स्पर्धा परीक्षेमध्ये हॅट्रिक मिळवली आहे. नुकत्याच झालेल्या स्पर्धा परीक्षेच्या निकालामध्ये मोनिका कांबळे हिची उपशिक्षण अधिकारी पदी निवड झाली आहे. यापूर्वी 2018 मध्ये कर निर्धारण प्रशासकीय अधिकारी (उप मुख्याधिकारी) तर 2019 मध्ये राज्य विक्रीकर निरीक्षक म्हणून निवड झाले होती. तर सध्या 2020 मध्ये उपशिक्षण अधिकारी म्हणून निवड झाली आहे अशी तिसऱ्यांदा तिने यश संपादन करत हॅट्रिक मिळवली आहे. स्पर्धा परीक्षेमध्ये वारंवार यश मिळवत असल्याने या मुलीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. यातून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळत आहे.

- लॉकडाऊन शिथील होताच आत्महत्यांच्या घटना वाढल्या; काय आहेत याची कारणे?

यावेळी मोनिका कांबळे म्हणाली, जीवनात यशस्वी होण्यासाठी भोवतालचे वातावरण अनुकूल असावे लागते असे काही नसते. जिद्दीने व प्रामाणिकपणे कठोर अभ्यास केल्यास यश हमखास मिळते हे मी अनेकदा दाखवून दिले आहे. यापुढे असाच स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू ठेऊन यूपीएससीची परीक्षा देऊन जिल्हाधिकारी होण्याचे माझे स्वप्न आहे. घरचा पाठिंबा असेल तर कोणालाही यश संपादन करता येते.

- 'अंतिम वर्षाच्या परीक्षेचा निर्णय...'; सरकारच्या निर्णयाबाबत विद्यार्थ्यांचं म्हणणं काय?

मोनिका कांबळे हिने सुरुवातीला खंडाळा तालुक्यात उप मुख्याधिकारी म्हणून काम पाहिले. त्यानंतर राज्य विक्रीकर निरीक्षक म्हणून निवड झाल्यावर गेले दहा महिने झाले पुणे येथे विक्रीकर निरीक्षक म्हणून काम करीत आहे. कोरोनाच्या महामारीच्या काळात अधिकारी म्हणून रेशन दुकानात मोफत धान्य गोर गरिबांना मिळते का? धान्यसाठा तपासणे व दुकानदारांच्या कामकाजावर नियंत्रण ठेवणे हे काम केले आहे. कोरोनाच्या काळात सध्या रेड झोन असणाऱ्या पर्वती, दांडेकर पूल, पानमळा, गणेश नगर,आंबील ओढा या झोपडपट्टीत जाऊन रेशन दुकाने तपासणे व गोर गरिबांना धान्य मिळवून देण्यास मदत केली आहे. तसेच गोरगरिबांना मोफत धान्य देण्यास पुढाकार घेऊन खऱ्या अर्थानं या युद्धाच्या काळात वस्तीमध्ये काम केले आहे म्हणून या मुलीचे सर्वत्र कौतुक करीत कोरोना योद्धा म्हणून ओळखले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Monica Kamble from Pune became the Deputy Education Officer