‘वायू’मुळे मॉन्सूनला ब्रेक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 17 जून 2019

गुजरातमध्ये मुसळधारची शक्यता
अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यालगत घोंघावत असलेले वायू चक्रीवादळ ओसरत आहे. गुजरातच्या किनाऱ्यापासून पश्‍चिमेकडे सरकत असलेले हे चक्रीवादळ पुन्हा गुजरातच्या किनाऱ्याकडे माघारी फिरणार आहे. हे वादळ गुजरातच्या किनाऱ्यावरील पोरबंदरपासून पश्‍चिमेकडे ७४० किलोमीटर, द्वारकापासून ४४० किलोमीटर आणि भूजपासून ५४५ किलोमीटर पश्‍चिमेकडे समुद्रात होते. हे वादळ सोमवारी मध्य रात्रीपर्यंत कमी दाबाने उत्तर गुजरातला धडकण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे मंगळवारपर्यंत (ता. १८) गुजरातमध्ये मुसळधार पावसाची शक्‍यता आहे.

पुणे - अरबी समुद्रात घोंघावणाऱ्या वायू चक्रीवादळामुळे नैॡत्य मोसमी पावसाला (मॉन्सून) लागलेला ब्रेक अद्यापही कायम आहे. मात्र, बंगालच्या उपसागरात मॉन्सूनच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण तयार होत आहे.

अरबी समुद्रात गेल्या मंगळवारी ‘वायू’ हे चक्रीवादळ तयार झाले. उत्तरेकडे सरकत गुजरातच्या समुद्रकिनाऱ्याच्या जवळ असतानाच हे चक्रीवादळ पश्‍चिमेकडे वळाले. गुजरात किनाऱ्यापासून दूर जात असतानाच त्याची तीव्रताही कमी झाली. आता याचे रूपांतर कमी दाबाच्या क्षेत्रात होत आहे. हे क्षेत्र गुजरातच्या समुद्रकिनाऱ्यावर पुढील दोन दिवसांमध्ये पोचेल. त्यामुळे कच्छ, सौराष्ट्र आणि दक्षिण गुजरातमध्ये मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. 

चक्रीवादळामुळे बदललेल्या वातावरणाचा थेट परिणाम अरबी समुद्रावरून येणाऱ्या मॉन्सूनवर झाला आहे. दक्षिण कर्नाटकात पोचलेल्या मॉन्सूनच्या शाखेने गेल्या तीन दिवसांपासून तेथेच मुक्काम ठोकला आहे. त्यामुळे दुष्काळात होरपळणाऱ्या महाराष्ट्रातही मॉन्सूनचे आगमन लांबले आहे.

साधारणपणे ७ जूनपर्यंत तळकोकणात मॉन्सूनचे आगमन होते, तर १० जूनपर्यंत मॉन्सून पुणे, मुंबईसह कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा बहुतांशी भाग व्यापतो. त्यानंतर १५ जूनपर्यंत मॉन्सून वेगाने वाटचाल करत, पूर्व भारतातील राज्य, गुजरात आणि मध्य प्रदेशाचा बहुतांशी भाग व्यापतो. यावर्षी सुरवातीपासून अडखळणाऱ्या मॉन्सूनची वाटचाल संथ गतीने सुरू आहे. १४ जून उलटूनही मॉन्सूनने दक्षिण कर्नाटकपर्यंतच मजल मारली आहे. 

बंगालच्या उपसागरावरील शाखेने आणखी एक टप्पा पूर्ण केला आहे. मॉन्सूनने संपूर्ण ईशान्य भारत व्यापून पूर्व भारतातील सिक्कीम, पश्‍चिम बंगालच्या काही भागापर्यंत मजल मारल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.

विदर्भ, मराठवाडा तापलेला
वायू चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने राज्यात पूर्वमोसमी पावसाने उघडीप दिली आहे. तर विदर्भासह मराठवाड्यात उष्णतेची लाट आली आहे. आज (ता. १७) विदर्भ आणि मराठवाड्यात उष्ण लाट येण्याचा इशारा आहे. तर कोकणात काही ठिकाणी, मध्य महाराष्ट्र, विदर्भात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. 

‘वायू’ चक्रीवादळ रविवारी गुजरातच्या किनाऱ्यापासून दूर गेले होते. या वादळाबरोबरच अरबी समुद्रातील बाष्प खेचून नेले आहे. त्यामुळे कोकणासह राज्यात पूर्वमोसमीच्या सरी थांबल्या आहेत. कोकण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. मात्र, ढगाळ हवामानामुळे मध्य महाराष्ट्र आणि कोकण विभागातील तापमान कमी झाले आहे. विदर्भात उष्णतेची तीव्र लाट असून, मराठवाडातही लाटेची स्थिती आहे. रविवारी (ता. १६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील ब्रह्मपुरी येथे ४४.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर अकोला, अमरावती, चंद्रपूर, नागपूर, गोंदिया, वर्धा, यवतमाळ तर मराठवाड्यातील परभणी, नांदेड येथे उष्ण लाट आली आहे. 

रविवारी (ता. १६) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) - पुणे ३२.१ (१.०), जळगाव ४०.२ (२.७), कोल्हापूर ३१.२(२.२), महाबळेश्वर २१.१ (-१.०), मालेगाव ३९.० (३.९), नाशिक ३१.४ (-१.३), सांगली ३२.४ (१.८), सातारा ३०.६ (१.१), सोलापूर ३७.३ (३.५), अलिबाग ३१.७ (०.६), डहाणू ३३.१ (०.६), सांताक्रूझ ३३.९ (२.०), रत्नागिरी ३१.८ (१.९), औरंगाबाद ३६.० (२.५), परभणी ४०.७ (५.४), नांदेड ४२.० (५.६), अकोला ४२.३ (५.४), अमरावती ४१.२ (४.३), बुलडाणा ३९.० (५.७), ब्रह्मपुरी ४४.३ (७.४), चंद्रपूर ४४.०(६.९), गोंदिया ४३.०(५.४), नागपूर ४३.२ (५.८), वाशिम ४०.६, वर्धा ४२.५ (५.६), यवतमाळ ४०.८(४.८).


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Monsoon Stop by Vayu Storm