#MonsoonTourism मढेघाट - निसरडे रस्ते धोकादायक

किरण भदे, नसरापूर
बुधवार, 20 जून 2018

सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या वेल्हे तालुक्‍यात पावसाळ्यात अनेक पर्यटनस्थळे आहेत. यामध्ये मुख्य आकर्षण म्हणजे मढेघाटावरील लक्ष्मी धबधबा आहे. तालुक्‍यातील शिवकालीन राजगड व तोरणा या किल्ल्यांवरदेखील पावसाळ्यात पर्यटक येतात; तसेच केळेश्‍वर, धानेप व भट्टी येथील धबधबेही प्रसिद्ध आहेत. पानशेत, वरसगाव व गुंजवणी ही धरणे आहेत. खरीव, कानंद, बामण, केळद, पाबे, पासली या मोठाल्या खिंडी आणि भट्टी, कादवे व पाबे हे घाट पावसाळ्यात पाहण्यासारखे आहेत.

मढेघाटाकडे जाण्यासाठी पासली घाट पार करावा लागतो. मात्र, अरुंद व वेडीवाकडी वळणे; तसेच सततच्या पावसाने हा रस्ता निसरडा झालेला असतो. दुचाकी किंवा चारचाकी चालवताना संयमाने, शिस्तीत न गेल्यास गाडी दरीत कोसळण्याची शक्‍यता असते. मागील वर्षी या दरीत जीप कोसळून एक जण गंभीर अपघात झाला आहे. केळद येथून मढेघाटला गेल्यावर लक्ष्मी धबधबा कोसळणारी दरी व कडा धुक्‍याने पूर्ण भरलेला असतो. येथील कड्यावरचा खडक सततच्या पावसाने निसरडा झालेला असतो. अशा वेळी खडकावरून काळजीपूर्वक चालावे लागते. तसेच, धुक्‍यामुळे पुढचे स्पष्ट दिसत नसल्याने कड्याच्या अत्यंत जवळ जाणे धोकादायक असते. मागील वर्षी या कड्यावरून एक पर्यटक खाली पडला होता. सुदैवाने झाडामध्ये अडकल्याने त्याचे प्राण वाचले होते. येथे दुचाकीने जाताना निसरड्या रस्त्यावरून काळजीपूर्वक जाणे आवश्‍यक आहे.

गुंजवणी धरणात तरुण व्यसन करून पोहण्यासाठी उतरतात, हे धोकादायक आहे. राजगड व तोरणा या किल्ल्यावर पावसाळ्यात चढाई करणे जास्त जोखमीचे आहे. राजगडावर वाजेघरवरून पायरी मार्ग असला, तरी किल्ल्यावर वाहणारा सुसाट वारा, निखळलेल्या तटबंदी, शेवाळलेले रस्ते, धोकादायक ठरू शकतात. तोरणा किल्ल्याची चढाई धोकादायक आहे. राजगड किल्ल्यावरील बालेकिल्ल्याची चढाई पावसाळ्यात अत्यंत धोकादायक आहे. 

घाट रस्त्याला संरक्षक कठडे करा
शासनाने पर्यटनासाठी वेल्हे तालुक्‍याकडे जाणीवपूर्वक लक्ष देणे गरजेचे आहे. या भागातील धोकादायक बाबीमधील मढेघाटावरील कड्यावर संरक्षक रेलिंग करावे. पासली घाटासह इतर रस्त्यांचे रुंदीकरण करावे. घाट रस्त्याच्या कडेला संरक्षक कठडे करावेत. पावसाळ्यात रस्त्यावरून पाणी न वाहण्यासाठी उपाययोजना कराव्यात. छोटे पूल मोठे करावेत. धरणावर सुरक्षा कर्मचारी नेमून पोहण्यास पूर्ण मज्जाव करावा. किल्ल्यावर जागोजागी धोक्‍याच्या सूचना देणारे फलक लावावेत. किल्ल्यावरील धोकादायक ठिकाणी प्रवेशबंदी करणे गरजेचे आहे. पावसाळ्यात किल्ल्यावरील तळ्यात उतरण्यास मज्जाव करावा. वेल्हे पोलिसांची संख्या वाढवावी. चेकनाके वाढवावेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: monsoon tourism rain tracking nature environment madhe ghat