#MonsoonTourism वरंध घाट - ‘आउट ऑफ कव्हरेज’

विजय जाधव, भोर
बुधवार, 20 जून 2018

भोर तालुक्‍यातील महाड मार्गावरील वरंध घाट, नीरा देवघर व भाटघर धरण, भोर- वाई मार्गावरील मांढरदेवीला जाणारा अंबाड खिंड घाट, रायरेश्‍वर व रोहिडेश्‍वर (विचित्रगड) किल्ला, आंबवडे येथील झुलता पूल, इंगवली येथील नीरा नदीवरील नेकलेस पॉइंट हे पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. 

भोर तालुक्‍यातील महाड मार्गावरील वरंध घाट, नीरा देवघर व भाटघर धरण, भोर- वाई मार्गावरील मांढरदेवीला जाणारा अंबाड खिंड घाट, रायरेश्‍वर व रोहिडेश्‍वर (विचित्रगड) किल्ला, आंबवडे येथील झुलता पूल, इंगवली येथील नीरा नदीवरील नेकलेस पॉइंट हे पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे. 

वरंध घाट भोर शहरापासून सुमारे ४५ किलोमीटर अंतरावर आहे. त्यापैकी भोर- निगुडघर हे १५ किलोमीटर अंतर आणि कोंढरी ते हिर्डोशी हे सुमारे ६ किलोमीटर अंतर वगळता ३० किलोमीटर अंतराच्या मार्गावरून प्रवाशांना व पर्यटकांना जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागतो. घाटातील रस्ता अरुंद असून, दोन्ही बाजूच्या साइडपट्ट्या खोल आहेत. त्यामुळे दोन गाड्या समोरासमोर आल्यास साइडपट्ट्यांमध्ये मोटारी अडकून बसतात. घाटातील वारवंड- शिरगाव ते घाटमाथ्यावरील धारमंडप या भागातील तीन मोठी धोकादायक वळणे काढलेली आहेत. परंतु, ‘बीएसएनएल’च्या लाइनसाठी पुन्हा तेथे खोदाई करण्यात आली आहे, त्यामुळे येथे धोका आहे. 

धारमंडप ते वाघजाई या टापूत अनेक मोठे धबधबे आहेत. परंतु, तेथे दरडी कोसळण्याचा धोका आहे. घाटातील रस्त्याच्या कडेने झाडेझुडपे असल्याने वळणावर वाहनांचे अपघात होण्याची शक्‍यता आहे. घाटात धोक्‍याच्या ठिकाणी लोखंडी संरक्षक कठडे उभारले आहेत. परंतु, ते गटाराच्या आतमध्ये रस्त्याच्या कडेलाच असल्याने रस्ता अधिक अरुंद झाला आहे. जोराच्या पावसामुळे डोंगरातील दगड-माती रस्त्यावर येते. त्यामध्ये गाड्या अडकून बसण्याचीही भीती आहे. पर्यटकांना गाड्या रस्त्यावरच उभ्या कराव्या लागतात. त्यातून अपघात होण्याची शक्‍यताही नाकारता येत नाही.

धुक्‍याच्या, दरीच्या व धबधब्याच्या ठिकाणी सेल्फी काढणे धोक्‍याचे आहे. घाटात कोणत्याही सेलफोनला रेंज नाही, त्यामुळे अपघातावेळी लवकर मदत मिळू शकत नाही. 

रेलिंग बसवावेत
वरंध घाटात प्रशासनाने विविध सुविधा निर्माण करणे गरजेचे आहे. घाटातील रस्त्याच्या दोन्ही बाजूंच्या साइडपट्ट्या मुरुमाने नव्हे; तर दगड व खडीने भराव्यात. खोदाईमुळे धोकादायक झालेल्या घाटातील वळणांचा रस्ता पूर्ववत करावा. धोकादायक व अपघातग्रस्त जागी रिफ्लेक्‍टरचे बोर्ड बसवावेत. दरडी कोसळण्याच्या आणि धबधब्यांच्या जवळ सुरक्षिततेसाठी रेलिंग बसवावेत आणि सावधानतेचे बोर्डही लावावेत. निगुडघर किंवा देवघर येथे आणि घाटातील वाघजाई मंदिराजवळ सी.सी.टी.व्ही. कॅमेरे बसवावेत. निगुडघर येथे पोलिसांचा तपासणीनाका असावा. फिरते पथक कार्यरत ठेवावे. किमान पावसाळ्यापुरती तरी घाटातील अपघातग्रस्त ठिकाणी स्वयंसेवकांची नेमणूक करावी.

Web Title: monsoon tourism rain tracking nature environment varandh ghat