बापरे! आंबेगाव तालुक्यातील निम्म्यापेक्षा अधिक गावे कोरोनाग्रस्त!

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 15 August 2020

मंचर शहरात सात रुग्ण आढळून आले असून शहरातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १४३ झाली आहे. अवसरी बुद्रुक आणि अवसरी खुर्द येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे.

मंचर (पुणे) : आंबेगाव तालुक्यात शनिवारी (ता.१५) कोरोनाचे नऊ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामध्ये महसूल विभाग, आरोग्य खाते आणि ग्रामपंचायतीतील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. त्यामुळे तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ४९९ झाली आहे. कोरोनाची लागण झालेल्या गावांची संख्या ५६ झाली आहे. तालुक्यातील निम्म्यापेक्षा अधिक गावे कोरोनाग्रस्त झाली आहेत.

मुळशी धरणातून उद्या होणार विसर्ग; मुळा नदीकाठच्यांना सतर्कतेचा इशारा!​

मंचर शहरात सात रुग्ण आढळून आले असून शहरातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १४३ झाली आहे. अवसरी बुद्रुक आणि अवसरी खुर्द येथे प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला आहे. आंबेगाव तालुक्यात एकूण १०३ ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी ५६ ग्रामपंचायतीच्या कार्यक्षेत्रात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनाचा उद्रेक थांबत नसल्याने प्रशासन आणि गावकरी चिंतेत पडले आहेत.

लॉकडाउन शिथिल झाल्यामुळे लोकांचा वावर वाढलेला आहे. तसेच मास्क न वापरणाऱ्यांची आणि वैयक्तिक काळजी न घेणाऱ्यांचीही संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पोलिस आणि ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे मोहीम राबवून सोशल डिस्टन्स न पाळणाऱ्या आणि विना मास्क फिरणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

काय म्हणावं या पुणेकरांना! प्रशासनाचे आदेश झुगारत खडकवासल्यावर केली गर्दी​

श्री क्षेत्र वडगाव काशिंबे येथील भीमाशंकर हॉस्पिटल, मंचर येथील उपजिल्हा रुग्णालय आणि अवसरी खुर्द येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयात सुरू केलेल्या कोव्हिड उपचार केंद्रात रुग्णांवर उपचार सुरू आहेत. स्वातंत्र्यदिनानिमित्त आज गोवर्धन दूध प्रकल्पाच्यावतीने तंत्रनिकेतन महाविद्यालयातील रुग्णांना स्वीट्ससह जेवण देण्यात आले. येथे दररोज गोवर्धन प्रकल्पामार्फत जेवण दिले जाते. रविवार (ता.१६) पासून मंचर उपजिल्हा रुग्णालयातील उपचार घेणाऱ्या रुग्णांना सकाळी दररोज नाष्ट्याची व्यवस्था केली जाईल, असे गोवर्धन दूध प्रकल्पाचे अध्यक्ष देवेंद्र शहा यांनी सांगितले.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: More than half of villages in Ambegaon taluka have been affected by corona