पीजीसाठी हवेत आणखी कर्मचारी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 24 July 2019

राज्य सरकारकडून कर्मचारी भरतीस बंदी आहे. त्यामुळे बढती आणि वारस नेमणूक पद्धतीने वायसीएम पीजी इन्स्टिट्यूटमध्ये आवश्‍यक कर्मचारी भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. येत्या आठवडाभरात या इन्स्टिट्यूटला सात ते आठ लिपिक देण्यात येतील.
- मनोज लोणकर, सहायक आयुक्त

पिंपरी - महापालिकेतर्फे वायसीएम पीजी इन्स्टिट्यूट अद्ययावत करण्यात येत आहे. मात्र, वायसीएम रुग्णालय आणि इन्स्टिट्यूटचे काम सुरळीत करण्यासाठी किमान १०० ते १२५ कर्मचाऱ्यांची आवश्‍यकता आहे. कर्मचाऱ्यांच्या पुरेशा संख्येअभावी कामावर ताण येत असून, डॉक्‍टरांसह अन्य विभागातील कर्मचारी त्रस्त झाले आहेत.

वायसीएम पीजी इन्स्टिट्यूटमध्ये भूलशास्त्र, कान-नाक-घसा, अस्थिरोग, स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र, विकृतीशास्त्र, बालरोग आणि मानसोपचार या सात वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या पदव्युत्तर शिक्षणाची सुविधा केली आहे.

त्यासाठी तज्ज्ञ प्राध्यापकांची नियुक्ती केली आहे. येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ग्रंथालयासह अन्य सुविधाही निर्माण केल्या आहेत. मात्र, ग्रंथालय विभागात कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या व शिपायांचा अभावामुळे प्राध्यापक त्रस्त झाले आहेत. महापालिकेने विद्यार्थ्यांसाठी लाखो रुपये खर्चून पुस्तके विकत घेतली आहेत. अनेक पुस्तकांच्या किमती २५ हजारांहून अधिक आहे. मात्र, विद्यार्थ्यांना ती देण्यासाठी केवळ एकच ग्रंथपाल उपलब्ध आहे. त्यामुळे ही पुस्तके देवाण-घेवाण करण्यासाठी कर्मचारीच उपलब्ध नाही. पदव्युत्तर विद्यार्थ्यांना शिकवणारे प्राध्यापक सकाळी ९ ते १२ या वेळेत रुग्णांवर उपचार करतात. त्यानंतर दुपारी शिकविण्याचे काम करतात. 

ग्रंथपाल, लेखनिक व शिपाई यांची पदे भरण्याबाबत महापालिकेला कळविण्यात आले आहे. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून त्यांनी काहीही प्रतिसाद न दिल्याने प्राध्यापकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्याचप्रमाणे वायसीएम रुग्णालयातील काही अधिकाऱ्यांकडून या प्राध्यापकांना योग्य वागणूक दिली जात नाही, असे प्राध्यापकांचे म्हणणे आहे. इन्स्टिट्यूटचे अधिष्ठाता डॉ. राजेश वाबळे म्हणाले, ‘‘येत्या काही काळात औषधशास्त्र, जनरल सर्जरी, रेडिओलॉजी या विषयांचे पदव्युत्तर शिक्षण देण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू आहे.’’ वायसीएम रुग्णालयात सहा महिने ते एक वर्ष या कालावधीसाठी काम करणारे सुमारे ९२ डॉक्‍टर आहेत. मात्र, दुसऱ्या रुग्णालयात अथवा अन्य ठिकाणी चांगली संधी मिळाल्यास अनेकजण कार्यकाल पूर्ण होण्याआधीच काम सोडून जातात. त्यामुळेही रुग्णसेवेवर परिणाम होतो, असे काही डॉक्‍टरांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: More staff want for PG YCM Hospital