

पान १२ - ८ साठी
------------------------------
शेवग्याची शास्त्रीय पद्धतीने छाटणीचे नियोजन
-----------------------------------------------
शेवगा पिकामध्ये नियमित व शास्त्रीय पद्धतीने छाटणी करणे हे उच्च उत्पादनासाठी अत्यावश्यक तंत्र आहे. योग्य उंचीवर शेंडा काढणे, उत्पादनानंतर छाटणी करणे आणि छाटणीनंतर खत व पाणी व्यवस्थापन करणे यामुळे झाडाची जोमदार वाढ, अधिक फुलधारणा, उच्च उत्पादन व चांगल्या दर्जाच्या शेंगा मिळतात.
---------------------------------------------------
डॉ. अतिश पाटील, रोहित कडू, जयराम गावित
---------------------------------------------------
शेवग्याचे योग्य व्यवस्थापन केल्यास हे पीक शेतकऱ्यांना वर्षभर नियमित उत्पन्न मिळवून देऊ शकते. हे झाड झपाट्याने वाढणारे असल्यामुळे त्याला योग्य वेळी योग्य आकार देणे व्यावसायिक उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. शेवग्यामध्ये योग्य छाटणी केल्यास नवीन फुटवे अधिक प्रमाणात येतात, फुलधारणा व शेंगांची संख्या वाढते, झाडाची उंची नियंत्रित राहते तसेच उत्पादन व गुणवत्ता सुधारते.
छाटणीचे प्रकार ः
प्रारंभिक छाटणी ः
- प्रारंभिक छाटणीला आकार छाटणी असेही म्हणतात.
- लागवडीनंतर रोप ६० ते ७५ सें.मी. उंच झाल्यावर मुख्य शेंडा खुडावा.
- मुख्य खोडावरील शेंडा खुडल्यानंतर त्याखालील बाजूस अनेक फुटवे येतात. अशा फुटव्यांपैकी जोमदार वाढीचे ४ ते ६ फुटवे चार दिशेला वाढवून इतर फुटवे काढून टाकावेत. त्यामुळे मजबूत ४ ते ६ बाजूंच्या फांद्या फुटतात.
- बाजूच्या जोमदार वाढीच्या फांद्यांना मुबलक फुलधारणा होण्यासाठी या फांद्या २.५ फुटीच्या वाढीनंतर नखाने त्यांचा कोवळा शेंडा खुडावा.
- अशा प्रकारे टप्प्याटप्प्याने वाढ होत जाणाऱ्या फांद्यांना २.५ फूट वाढीनंतर शेंडा खुडण्याच्या पद्धतीला ‘स्टॉप अँड गो’ पद्धत म्हणतात.
या फांद्यांवर पुढे भरपूर फुले व शेंगा येतात.
वाढ नियंत्रित करणारी छाटणी ः
- आकार छाटणीचा हा दुसरा टप्पा आहे. झाडाची उंची २ ते २.५ मीटरपेक्षा जास्त झाल्यास उंच फांद्या कमी कराव्यात.
- उंच फांद्याची कापणी करतेवेळी झाडाच्या मध्यभागाची फांदी २.५ मीटर वर कापावी. यामुळे मधील भाग खुला होऊन सूर्यप्रकाश आतील भागात येतो.
- झाडाची उंची नियंत्रित राहिल्याने फवारणी व काढणी सोपी होते.
उत्पादनानंतरची छाटणी ः
- उत्पादनानंतरची छाटणी याला फळ छाटणी असेही म्हणतात.
- शेंगांचा हंगाम संपल्यानंतर उत्पादन दिलेल्या फांद्या ५० ते १०० सें.मी. पर्यंत मागे कापाव्यात. यामुळे अशा मागील हंगामातील उत्पादनक्षम फांद्यांना उप-फुटवे निघतात. अशा उपफुटव्यांना फुलधारणा होऊन शेंग तयार होते.
- यामुळे नवीन फुटवे येऊन पुढील हंगामात अधिक उत्पादन मिळते.
पुनरुज्जीवन छाटणी ः
- पुनरुज्जीवन छाटणीला खरड छाटणी असे म्हणतात. ५ ते ६ वर्षे जुनी किंवा उत्पादन कमी झालेली झाडे जमिनीपासून ७५ ते १०० सें.मी. उंचीवर छाटावीत. अशा मुख्य खोडापासून येणाऱ्या फांद्यांपैकी ४ ते ६ जोमदार फांद्या ठेवून उर्वरित फांद्या काढून टाकाव्यात.
- पुनरुर्जीवन छाटणी मधील यानंतरचे सर्व छाटणीची कामे प्रारंभिक सांगाडा/आकार छाटणी प्रमाणे करावीत. यामुळे जुने झालेले झाड पुन्हा नव्याने भरघोस फुल व फलधारणा करते.
छाटणी करण्याची योग्य वेळ ः
- शेंगा काढणी पूर्ण झाल्यानंतर.
- उन्हाळ्याच्या शेवटी किंवा पावसाळ्यापूर्वी.
- अतिवृष्टी किंवा तीव्र थंडीच्या काळात छाटणी टाळावी.
छाटणीचे महत्त्व ः
- झाडाचा मजबूत सांगाडा तयार करणे. बाजूच्या फांद्यांची संख्या वाढविणे.
- प्रकाश व हवेचा योग्य प्रवेश होणे.
- फुलधारणा व शेंगांचे उत्पादन वाढविणे.
- रोगट, सुकलेल्या व अनुत्पादक फांद्या काढून टाकणे.
- काढणी सुलभ करणे.
- झाडाचे उत्पादनक्षम आयुष्य वाढविणे.
छाटणी करताना घ्यावयाची काळजी ः
- धारदार व निर्जंतुक छाटणीची साधने वापरावीत.
- छाटणी तिरकी करावी, जेणेकरून छाटलेल्या भागावर पाणी साचणार नाही.
- मोठ्या जखमांवर बोर्डो पेस्ट किंवा कॉपर ऑक्सिक्लोराइड लावावे.
- छाटणीनंतर शिफारशीनुसार खत व सिंचन द्यावे. कीड, रोगांचे नियमित निरीक्षण करावे.
-------------------------------------
छाटणीचे फायदे ः
- झाडाची उंची नियंत्रणात राहते. फुलधारणा व शेंगांची संख्या वाढते.
- एकसारख्या दर्जाच्या शेंगा मिळतात. काढणीचा खर्च कमी होतो.
- रोग व किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.
- २० ते ४० टक्यांपर्यंत उत्पादनवाढ होऊ शकते.झाडाचे उत्पादनक्षम आयुष्य वाढते.
छाटणीनंतरची वाढ ः
- शेवग्याच्या झाडाची छाटणी केल्यावर साधारणपणे चार महिन्यांत झाडाला नवीन मोहर येतो. त्यानंतर मोहर उमलून फुलांचे रूपांतर छोट्या शेंगांमध्ये होते आणि पुढील २ ते २.५ महिन्यांत शेंगा पूर्णपणे तयार होऊन तोडणीस तयार होतात. एकूणच छाटणीनंतर शेंगा मिळण्यासाठी ६ ते ६.५ महिन्यांचा कालावधी लागतो.
- काही सुधारित वाणामध्ये ५ ते ६ महिन्यांनी शेंगा काढणीस तयार होतात. पूर्ण वाढ झालेल्या व हिरवा रंग टिकून असलेल्या शेंगा काळजीपूर्वक तोडाव्यात. काढणीनंतर प्लॅस्टिक कागद गोणपाटावर गुंडाळल्यास शेंगांचा ताजेपणा अधिक काळ टिकून राहतो.
- योग्य व्यवस्थापन केल्यास एका चांगल्या विकसित झाडापासून दरवर्षी सुमारे २५ ते ५० किलो शेंगांचे उत्पादन मिळू शकते.
-------------------------------------------------------------------
इन्फो ः
अन्नद्रव्य व्यवस्थापन ः
सेंद्रिय खते ः
- झाडाच्या वाढीच्या काळात वर्षातून एकदा, मुख्यत्वे पावसाळ्याच्या सुरुवातीस प्रत्येक झाडाला वय परत्वे १० ते ५० किलो चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत बांगडी पद्धतीने मातीआड करावे.
- भारी जमिनीत बुरशीमुळे मुळकूज होऊन झाडे वाळतात. त्यासाठी ट्रायकोडर्मा पावडर १५ ते २० ग्रॅम प्रति झाड शेणखतात मिसळून द्यावी.
- झाडाच्या चांगल्या वाढीसाठी प्रति झाड १ ते २ किलो गांडूळ खत आणि १ किलो निंबोळी पेंड खोडाभोवती मातीत मिसळून द्यावी.
- सेंद्रिय खतांमुळे शेंगांचे प्रमाण, रंग गडद हिरवा व चकाकीयुक्त राहतो. शेवग्याची चव आणि प्रत सुधारते, ज्यामुळे बाजारात चांगला भाव मिळतो. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते आणि पिकाला आवश्यक अन्नद्रव्ये सहज मिळतात.
रासायनिक खते ः
- माती परीक्षणावर आधारित शिफारशीनुसार नत्र, स्फुरद व पालाश खतांचा वापर करावा. सर्वसाधारण प्रति झाडास पावसाळ्याच्या सुरुवातीस ७५ ग्रॅम नत्र (१६५ ग्रॅम युरिया), ५० ग्रॅम स्फुरद (३१२ ग्रॅम सिंगल सुपर फॉस्फेट) व ७५ ग्रॅम पालाश (१२० ग्रॅम म्युरेट ऑफ पोटॅश) शेणखतात मिसळून द्यावे.
जिवाणू संवर्धकांचा वापर ः
- जिवाणू संवर्धक हे पिकाच्या वाढीसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. यामुळे जमिनीची सुपीकता वाढते. झाडांची मुळे मजबूत होतात. जमिनीतील नत्र स्थिरीकरण करणे, स्फुरद विरघळवणे व पालाश पिकांना उपलब्ध करून देण्याचे काम जिवाणू संवर्धक करत असतात. तसेच रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढवतात.
- द्रवरूप जिवाणू संवर्धक ठिबक सिंचनातून २ लिटर प्रति एकर या प्रमाणात द्यावे किंवा २ लिटर जिवाणू खत ५० किलो शेणखतात मिसळून झाडाभोवती समप्रमाणात मातीआड करावे.
- जिवाणू संवर्धकांचा वापर केल्याने १५ ते २० टक्के रासायनिक खतांची बचत होते. तसेच पीक उत्पादनात १० ते २० टक्के वाढ होते.
सूक्ष्म अन्नद्रव्य ः
- सूक्ष्म अन्नद्रव्यांची कमतरता असल्यास पानांवर फवारणी करावी. शेवग्यास फुले येण्यापूर्वी व शेंगा धारणेच्या वेळी १०० मिलि प्रति १० लिटर पाण्यातून द्रवरूप मायक्रो ग्रेड II (सूक्ष्म अन्नद्रव्य पोषक) याची दोन वेळा फवारणी करावी.
- ठिबकद्वारे द्यायचे झाल्यास द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्य २ लिटर प्रति २०० लिटर पाण्यातून पहिली मात्रा शाकीय अवस्थेत व दुसरी मात्रा फुले येण्यापूर्वी द्यावी किंवा हीच मात्रा आळवणीद्वारे सुद्धा जमीन वाफशावर असताना करता येते.
- द्रवरूप सूक्ष्म अन्नद्रव्य पोषक ग्रेडमध्ये कोणतेही कीटकनाशक, बुरशीनाशक, तणनाशक किंवा इतर विद्राव्य खत मिसळून फवारणी करू नये.
- पुरेशा ओलाव्यासाठी वेळेवर सिंचन करावे.
----------------------------------------------------
संपर्क ः डॉ. अतिश पाटील, ९९२२८१७०१८
(विषय विशेषज्ञ, मृद् विज्ञान, कृषी विज्ञान केंद्र, धुळे)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.