
घरी परतणा-या मायलेकावर काळाने घातला घाला; चिरडून दोघांचा अंत
शिरूर - शिरूरच्या मार्केटमध्ये कांदा व भाजीपाला विक्री करून, राळेगणसिद्धी (ता. पारनेर) येथे घरी परतणा-या मायलेकावर काळाने घाला घातला. पुणे - नगर रस्त्यावर गव्हाणवाडी (ता. श्रीगोंदा) हद्दीत भरधाव वेगातील कंटेनर दूभाजक तोडून विरूद्ध दिशेला येऊन पलटी झाल्याने त्याखाली चिरडून या मायलेकराचा अंत झाला. आज पहाटे साहेसहाच्या सुमारास हा अपघात झाला.
स्वप्निल उर्फ बंडू बाळू मापारी (वय २७) व लक्ष्मीबाई बाळू मापारी (वय ६२, दोघे रा. राळेगण सिद्धी, ता. पारनेर, जि. नगर) अशी या अपघातात मृत्युमूखी पडलेल्या मायलेकराची नावे आहेत. ते दोघे शिरूरच्या मार्केटमध्ये आज सकाळी कांदा व भाजीपाला विक्रीसाठी घेऊन आले होते. घाऊक विक्रेत्यांना माल विकल्यावर साडेसहाच्या सुमारास ते आपल्या दूचाकीवरून घरी राळेगण सिद्धी येथे जात होते. शिरूर शहरापासून तीन किलोमीटर अंतरावर गव्हाणवाडी नजीक ते गेले असताना नगरहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने जाणारा कंटेनर (क्र. एमएच ४६ एएफ ०२७२) हा दूभाजक तोडून विरूद्ध दिशेने जाणा-या दूचाकी (क्रमांक एमएच २२ जी ५१४५) वर उलटला. व त्याखील चिरडून या मायलेकराचा दूर्दैवी अंत झाला.
अपघातानंतर कंटेनर रस्त्यातच आडवा झाल्याने पुणे - नगर महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. त्यावेळी शिरूर, रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. क्रेनच्या सहाय्याने कंटेनर बाजूला काढल्यावर त्याखाली अडकलेल्या स्वप्निल मापारी व लक्ष्मीबाई मापारी यांना बाहेर काढता आले. पोलिस हवालदार संतोष औटी, प्रफुल्ल भगत, राळेगण सिद्धीचे सरपंच लाभेश औटी, सुनील हजारे, सुरेश पठारे, गणेश पोटे, विठू गाजरे, बाळासाहेब फटांगरे व स्थानिक तरूणांनी मदतकार्य केले. दरम्यान, बेलवंडी पोलिसांनी या अपघाताची नोंद केली. कंटेनर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक नंदकुमार दुधाळ, उपनिरीक्षक प्रकाश बोराडे यांच्यासह मारूती कोळपे, भाऊसाहेब शिंदे, संपत गुंड या पोलिस पथकाने घटनास्थळी धाव घेऊन सुमारे तासाभरानंतर वाहतूक सुरळीत केली.
या अपघातात मृत्युमूखी पडलेल्या स्वप्निल मापारी यांचा दीड वर्षांपूर्वी विवाह झाला आहे. या अपघातात त्यांचा दूर्दैवी अंत झाल्याने सुखी संसाराचा डाव अर्ध्यावरच मोडला. घटनास्थळी राळेगण सिद्धीचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मायलेकराच्या मृत्युने राळेगण सिद्धी परिवारावर शोककळा पसरली. कष्टाळू परिवार अशी परिसरात ख्याती असलेल्या मापारी कुटूंबातील दोघांचा अपघाती मृत्यु झाल्यानेनातेवाईकांच्या दुःखाला पारावार राहिला नाही. त्यांच्या आक्रोशाने अपघातस्थळी उपस्थित असलेले लोकही हळहळले.