चालकाच्या कुटुंबाला पावणेनऊ लाख द्या; अपघाती मृत्यूप्रकरणी मालकाला आदेश 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 डिसेंबर 2019

अपघातात मृत्यू झालेल्या चालकाच्या कुटुंबीयांना पावणेनऊ लाखांची नुकसानभरपाई मोटारमालकाने द्यावी, असा आदेश मोटार अपघात न्याय प्राधिकरणाने दिला. 

पुणे - अपघातात मृत्यू झालेल्या चालकाच्या कुटुंबीयांना पावणेनऊ लाखांची नुकसानभरपाई मोटारमालकाने द्यावी, असा आदेश मोटार अपघात न्याय प्राधिकरणाने दिला. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

नातेपुते ते फलटण असा प्रवास करताना माळशिरस तालुक्‍यातील मोरोची येथे मोटारीचा पाच मार्च 2012 रोजी अपघात झाला. त्यात चालकासह चौघांचा मृत्यू झाला होता. त्यात चालकाची पत्नी वाचली होती. याप्रकरणी नातेपुते पोलिसांनी मोटारचालक रस्त्याच्या विरुद्ध दिशेने येत होता. त्यामुळे अपघात झाल्याचा गुन्हा नोंदविला होता. त्याविरुद्ध चालकाची पत्नी व त्यांच्या मुलांनी मोटार अपघात न्याय प्राधिकरणामध्ये दावा दाखल केला होता. त्यामध्ये पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने गुन्हा दाखल केल्याचे निष्पन्न झाले होते; तसेच मयत चालकाला दरमहा आठ हजार रुपये पगार होता, त्याच्यावर कुटुंब अवलंबून होते. मोटारमालक, टॅंकर कंपनी व टॅंकरची विमा कंपनी यांच्या मालकाविरुद्ध दावा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये 15 लाखांची नुकसानभरपाई मागितली होती. दरम्यान, वारंवार नोटीस बजावूनही मालकाने न्यायालयात हजेरी लावली नाही; तर टॅंकरमालक व विमा कंपनीचे प्रतिनिधी न्यायालयात हजर होते. टॅंकरचालक डाव्या बाजूने गाडी चालवित असताना चालक भरधाव मोटार चालवित होता. त्याचे नियंत्रण सुटल्याने त्यांची मोटार विरुद्ध बाजूचा दुभाजक तोडून समोरून येणाऱ्या टॅंकरला धडकल्याचे सांगत त्यांच्याविरुद्धचा दावा फेटाळण्याची मागणी टॅंकर कंपनीच्या वकिलांनी केली. त्यानुसार, न्यायालयाने मयत मोटारचालक हा त्या त्याच्या मोटारमालकाकडून नुकसानभरपाई घेण्यास पात्र असल्याचे सांगून पावणेनऊ लाखांची नुकसानभरपाई देण्याचे आदेश न्याय प्राधिकरणाचे सदस्य एस. आर. तांबोळी यांनी दिला. याबरोबरच अन्य दोन मृतांच्या नातेवाइकांना पाच लाख सहा हजार रुपये देण्याचेही आदेश दिले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Motor Accident Justice Authority ordered the motorist to pay compensation to the driver's family