श्रीरामपूर गुन्हे वार्ता - ९ मे

श्रीरामपूर गुन्हे वार्ता - ९ मे
Published on

भरधाव दुचाकीच्या
धडकेत वृद्ध जखमी
श्रीरामपूर : बेलापूर खुर्द येथील जोशीवस्ती परिसरात भरधाव दुचाकीच्या धडकेत एका वृद्धास गंभीर दुखापत झाली. हा अपघात २ मे रोजी सायंकाळी सातच्या सुमारास श्रीरामपूर-राहुरी रस्त्यावर घडला. रामदास बाबुराव जोशी (रा. जोशीवस्ती, बेलापूर खुर्द) हे रस्ता ओलांडून शेतात जात असताना राहुरीकडे जाणाऱ्या दुचाकीने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात त्यांच्या उजव्या पायाचे हाड मोडले असून, डोक्यास व कानास दुखापत झाली. त्यांच्यावर अहिल्यानगर येथील खासगी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली. या प्रकरणी नारायण जोशी यांनी बेलापूर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. दुचाकीस्वार विक्रम संभाजी औताडे (रा. राहुरी खुर्द) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
----------
कोयता, चॉपरने
हल्ला; चौघांवर गुन्हा
श्रीरामपूर : शहरातील संजयनगर परिसरात जुन्या वादातून भंगार व्यावसायिकावर कोयता व चॉपरने हल्ला केल्याची घटना घडली. याप्रकरणी चौघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. जाफर करीम शेख (रा. संजयनगर, श्रीरामपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गुरुवारी (ता.७) रात्री साडेनऊच्या सुमारास ते संजयनगर परिसरातून जाताना बाबा ऊर्फ साहिल शेख, रिहान शेख, गणेश रामदास सकट व तौफिक बब्बू पिंजारी (सर्व रा. श्रीरामपूर) यांनी त्यांना अडवून शिवीगाळ व मारहाण केली. यावेळी साहिल शेखने कोयत्याने डोक्यात वार केला, तर तौफिक पिंजारीने चॉपरने हल्ल्याचा प्रयत्न केला. या मारहाणीत जाफर शेख जखमी झाले. त्यांच्यावर साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
-----------
किरकोळ वादातून
शेतकऱ्यास मारहाण
श्रीरामपूर : शिरसगाव परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका शेतकऱ्यास लोखंडी रॉडने मारहाणीची घटना घडली. याप्रकरणी दोघांसह चार अनोळखी विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. चंद्रशेखर रमाकांत आदिक (रा. सहयोग हाऊसिंग सोसायटी, नेवासे रस्ता, शिरसगाव) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, बुधवारी (ता. ६) दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घरासमोर काही युवक भांडण करत असल्याने त्यांनी त्यांना समज दिली. त्याचा राग आल्याने जितेश व रितेश राधाकृष्ण गायकवाड (रा. सुतगिरणी, श्रीरामपूर) चौघा अनोळखींसह तेथे आले. यावेळी रितेशने लोखंडी रॉडने आदिक यांच्या गुडघ्यावर मारहाण केली, तर जितेशने शिवीगाळ व जीवे मारण्याची धमकी दिली. भांडण सोडविण्यास आलेल्या उषा आदिक यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. जखमी चंद्रशेखर आदिक यांच्यावर साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
---------

सोलर मोटार
केबलची चोरी
श्रीरामपूर : टाकळीभान शिवारातील शेतातून सोलर मोटार व केबल चोरीला गेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी चोरट्याविरोधात तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मयूर अशोकराव पटारे (रा. टाकळीभान) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या शेतातील विहिरीवर बसविण्यात आलेली पाच एचपी सोलर मोटार व सुमारे २०० फूट लांबीची केबल चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना २५ एप्रिलला सायंकाळी सहा ते २६ एप्रिल सकाळी दहाच्या दरम्यान घडली. चोरीस गेलेल्या साहित्याची किंमत सुमारे १५ हजार रुपये असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
------
गोतस्करीच्या संशयावरून
मारहाण; गुन्हा दाखल
श्रीरामपूर : गोतस्करीचा संशय घेत काही जणांनी तिघांना बेदम मारहाण करून कारची तोडफोड केल्याची घटना हरेगाव परिसरात घडली. याप्रकरणी भोला शंकर साळवे याच्यासह १० ते १२ अनोळखी व्यक्तींविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. हुसेन इकबाल कुरेशी (वय ३२, रा. वॉर्ड दोन, श्रीरामपूर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सोमवारी (ता. ४) ते जनावरे खरेदीसाठी हरेगाव येथे गेले होते. परत येताना त्यांची कार बंद पडल्याने ती टोचन करून आणत असताना मंगळवारी (ता. ५) पहाटे अडीचच्या सुमारास काहीजण दुचाकीवरून आले. त्यांनी गोवंश तस्करीचा संशय घेत हुसेन कुरेशी व त्यांच्या सहकाऱ्यांना शिवीगाळ करत लाठ्याकाठ्यांनी मारहाण केली. कारची तोडफोड करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com