तरुणांनो, हेल्मेट अडचण नाही, तर जीवनरक्षक कवच!

तरुणांनो, हेल्मेट अडचण नाही, तर जीवनरक्षक कवच!
Published on: 

ओतूर, ता. १४ : उदापूर गावच्या हद्दीत अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात ओंकार दिनकर अमूप या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे दुचाकीस्वारांची सुरक्षितता आणि हेल्मेट वापराच्या गरजेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
ओंकारच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉ. वैष्णवी ठिकेकर यांच्या मते, ‘ओंकारने हेल्मेट घातले असते, तर त्याचा जीव वाचण्याची शक्यता होती.’ ही घटना प्रत्येक दुचाकीस्वारासाठी एक धडा आहे. अनेक तरुण हेल्मेटला अडचण, सक्ती किंवा फॅशनमध्ये अडथळा समजतात. काहींना आपल्या वाहन चालवण्याच्या कौशल्याचा अतिआत्मविश्वास असतो. मात्र, रस्त्यावरील अपघात अनपेक्षित असतात आणि ते क्षणात आयुष्य उद्ध्वस्त करू शकतात. हेल्मेट अपघात रोखू शकत नसले, तरी अपघातावेळी डोक्याला होणारी गंभीर इजा टाळून जीव वाचवू शकते.
सहाय्यक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांनी सांगितले की, ‘‘घरी आपली कोणीतरी वाट पाहत आहे, हे लक्षात घेऊन प्रत्येकाने वाहतुकीचे नियम पाळावेत. हेल्मेटमुळे अनेक दुचाकीस्वारांना जीवदान मिळाल्याची उदाहरणे आहेत.’’
ओंकारच्या मृत्यूने एका कुटुंबाचा आधार हिरावला आहे. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी तरुणांनी स्वतःच्या सुरक्षिततेची जबाबदारी स्वीकारणे आवश्यक आहे. दुचाकी चालवताना केवळ चालकानेच नव्हे, तर मागे बसणाऱ्या व्यक्तीनेही दर्जेदार हेल्मेट वापरावे. यासोबतच वेगावर नियंत्रण, वाहतूक नियमांचे पालन आणि वाहन चालवताना मोबाईलचा वापर टाळणेही तितकेच महत्त्वाचे आहे.
घरातून बाहेर पडताना हेल्मेट डोक्यावर घाला, गाडीच्या हँडलला अडकवू नका. कारण तुमची सुरक्षितता ही तुमच्या कुटुंबासाठी सर्वात महत्त्वाची आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.