पुण्यात गिरीप्रेमी संस्थेमार्फत महिलांना गिर्यारोहणाचे धडे

अक्षता पवार
Tuesday, 5 January 2021

"गिरीप्रेमी' या गिर्यारोहण संस्थेच्या वतीने "गुरुकुल'च्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.

पुणे ः महिलांनी आपल्या कर्तृत्वातून सर्वच क्षेत्रांत ठसा उमटवलाय. मात्र गिर्यारोहण हे त्यांच्यासाठी नेहमीच आव्हानात्मक राहिले आहे. आता त्यांनाही उंच शिखरांचे टोक गाठत गिर्यारोहणाचा आनंद घेता यावा, यासाठी "गिरीप्रेमी' या गिर्यारोहण संस्थेच्या वतीने "गुरुकुल'च्या माध्यमातून त्यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

महिलांना गिर्यारोहणात उत्तुंग यश मिळावे, हिमालयातील मोहिमांत त्यांचा सहभाग वाढावा, या उद्देशाने हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार "गिरीप्रेमी'तर्फे सप्टेंबर महिन्यात हिमालयातील गंगोत्री परिसरात खास महिलांसाठी गिर्यारोहणाची मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी सहा ते सात महिलांची निवड केली जाणार आहे. या संधीचा लाभ घेण्यासाठी सध्या 21 ते 50 हून अधिक वयोगटातील 21 महिला गुरुकुलच्या अंतर्गत प्रशिक्षण घेत आहेत. अनलॉकनंतर गिर्यारोहणासाठी परवानगी देण्यात आल्याने या महिलांना हंपी, लोणावळा यांसारख्या विविध भागांतील गडकिल्ल्यांवर गिर्यारोहणाचे प्रशिक्षण दिले जात आहे.

काय आहे "गुरुकुल' संकल्पना?
गिर्यारोहणासाठी पुरुषांच्या तुलनेने महिलांचा संख्या कमी असते. गेल्या काही वर्षांपासून महिलांची या साहसी खेळास पसंती वाढली आहे. त्यातील अनेकींना आवड असूनही गिर्यारोहणाचे योग्य प्रशिक्षण मिळत नाही. यामुळे त्यांना विविध ट्रेकमध्ये सहभाग घेता येत नाही. यासाठी "गिरीप्रेमी' संस्थेने लॉकडाउन काळात "गुरुकुल'ची संकल्पना राबविली. यामध्ये महिलांना आणि मुलींना शारीरिक तंदुरुस्तीसाठी विविध व्यायाम, आरोग्यासाठी पोषक आहार आणि गिर्यारोहणासंबंधित प्रशिक्षण दिले जात आहे. गेल्या आठ महिन्यांपासून मुलींचा एक गट गिर्यारोहणाच्या मोठ्या मोहिमेसाठी प्रशिक्षण घेत आहे. इतर शहरांतील महिला देखील नियमितपणे प्रशिक्षणासाठी पुण्यात येत आहेत, असे "गिरीप्रेमी'चे ज्येष्ठ गिर्यारोहक आणि शिव छत्रपती पुरस्कार सन्मानित गिर्यारोहक उमेश झिरपे यांनी सांगितले.

जुन्नरच्या आजींची कमाल! वयाच्या ७२ वर्षी 2 दिवसात 2 किल्ले केले सर 

मला लहानपणापासून ऍडव्हेंचरची आवड आहे. मात्र कामाच्या व्यापामुळे छंदासाठी फारसा वेळे देणे शक्‍य नसायचे. 54 व्या वर्षांत पदार्पण केल्यानंतर आता गिर्यारोहण करणे शक्‍य होईल, असे वाटत नव्हते. परंतु, गिरीप्रेमीच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेल्या मोहिमेत सहभाग घेतल्यानंतर माझा विश्‍वास वाढला आहे. मी माझ्याबरोबर असलेल्या तरुण मुलींसोबत "रॉक क्‍लाइंबिंग' देखिल करते. -अंजली कात्रे, गिरीप्रेमीच्या प्रशिक्षणार्थी

(संपादन : सागर डी. शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mountaineering lessons for women in pune