खासदार अमोल कोल्हे आणि मंत्री आदित्य ठाकरे यांची पाऊण तास चर्चा, वाचा सविस्तर

डी.के.वळसे पाटील
Wednesday, 4 November 2020

सुमारे पाऊन तास चाललेल्या चर्चेत खासदार डॉ. कोल्हे यांनी जुन्नर येथे 'शिवसंस्कार सृष्टी' उभारण्या मागील संकल्पना स्पष्ट केली.

मंचर : शिवसंस्कार सृष्टी, भक्ती-शक्ती कॉरिडॉर आणि शिरुर लोकसभा मतदार संघातील पर्यटनाच्या संधी या विषयी राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्यजी ठाकरे सकारात्मक असून 'शिवसंस्कार सृष्टी' प्रकल्पाच्या सादरीकरणासाठी लवकरच बैठक घेण्याचे त्यांनी मान्य केले आहे, अशी माहिती खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी दिली.
 
'राजा शिवछत्रपती' मालिकेतील भूमिका करताना आलेल्या अनुभवांचं 'शिवगंध' या पुस्तकाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते नुकतेच प्रकाशन पार पडले. या पुस्तकाची प्रत ठाकरे यांना मंत्रालयात देण्यात आली.
 
सुमारे पाऊन तास चाललेल्या चर्चेत खासदार डॉ. कोल्हे यांनी जुन्नर येथे 'शिवसंस्कार सृष्टी' उभारण्या मागील संकल्पना स्पष्ट केली. या प्रकल्पाचे प्रेझेंटेशन तयार असून त्याचे सादरीकरण करण्यासाठी वेळ द्यावा, अशी विनंती केली. पर्यावरणमंत्री ठाकरे यांनी ही विनंती मान्य केली. तसेच पर्यटन वाढीसाठी राज्य सरकार व आपण स्वतः सकारात्मक असल्याचे सांगून सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे, असे डॉ. कोल्हे यांनी सांगितले. 

'शिवसंस्कार सृष्टी' प्रमाणेच महत्त्वाकांक्षी भक्ती-शक्ती कॉरिडॉर, नेचर ट्रेल आणि मतदारसंघातील पर्यटनाच्या विविध संधींबाबत चर्चा झाली. या सर्व प्रकल्पांबाबत काही मौलिक सूचना करुन अनुकूल प्रतिसाद देत पर्यावरण मंत्री ठाकरे यांनी लवकरच बैठक घेण्याचे मान्य केले, असे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

संपादन - सुस्मिता वडतिले 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Dr Amol Kolhe informed that he will soon hold a meeting with Environment Minister Adityaji Thackeray for the presentation of Shiv Sanskar Shrishti Project