सारथीच्या माध्यमातून मराठा समाजाची होत असलेली बदनामी थांबवा : संभाजीराजे

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 1 February 2020

संस्थेत भ्रष्टाचार झाला असेल, तर ती रक्कम नेमकी किती? प्रसार माध्यमांतून केवळ सारथी संस्थेलाच टार्गेट केलं जातं आहे. जर कुणी भ्रष्टाचार केलाच असेल, तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. आमच्या दृष्टीने कुणी व्यक्ती महत्वाची नाही, तर मराठा समाजाच्या हिताची ही संस्था महत्वाची आहे.

पुणे : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मनुष्यबळ विकास संस्थेची (सारथी) आणि त्यामाध्यमातून मराठा समाजाची होत असलेली बदनामी थांबवा. माझे पणजोबा, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या नावावर ही संस्था आहे, तिची प्रतिष्ठा जपली गेलीच पाहिजे. अशी मागणी खासदार संभाजीराजे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सारखी संस्थेबाबत सध्या अनेक चर्चा सुरु आहेत. नव्या पैशाचाही भ्रष्टाचार सारथीत झाला नसल्याचे व्यवस्थापकीय संचालक डी. आर. परिहार यांनी म्हटले आहे. संभाजीराजे यांनी नुकतेच सारथी संस्थेबाहेर आंदोलन केले होते. यावेळी त्यांची भेट घेऊन एकनाथ शिंदेंनी त्यांच्या मागण्या मान्य केल्या होत्या. आता संभाजीराजे यांनी याविषयी वक्तव्य केले आङे.

संभाजीराजे म्हणाले, की संस्थेत भ्रष्टाचार झाला असेल, तर ती रक्कम नेमकी किती? प्रसार माध्यमांतून केवळ सारथी संस्थेलाच टार्गेट केलं जातं आहे. जर कुणी भ्रष्टाचार केलाच असेल, तर त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे. आमच्या दृष्टीने कुणी व्यक्ती महत्वाची नाही, तर मराठा समाजाच्या हिताची ही संस्था महत्वाची आहे. या संस्थेत जो काही घोटाळा झाला असेल त्याची CAG सारख्या नामांकित संस्थेकडून चौकशी करा. तो अहवाल सार्वजनिक करावा. पारदर्शकता असलीच पाहिजे. मंत्रिमंडळातील दोन जेष्ठ मंत्र्यांच्या उपस्थितीत दोन्ही बाजूच्या लोकांना बोलावून सामोरा समोर चौकशी करून जनतेच्या मनातील शंका दूर करा. त्या चौकशीचे थेट वार्तांकन करा. ज्यांच्यावर आरोप आहेत, त्यांना चौकशी समिती ने बोलवून विचारपुस केली आहे का? की दुय्यम दर्जाच्या कर्मचाऱ्यांकडून माहिती घेऊन तीत भ्रष्टाचार झाला असे जाहीर करण्यात येत आहे? 

आम्ही आंदोलन केलं, त्याठिकाणी आपण मुख्यमंत्री महोदयांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित होता. माझ्याशी मुख्यमंत्री स्वतः बोलले. आपण आमच्या सर्व मागण्या मान्य केल्याचे जाहीर केले, त्यापैकी अंमलबजावणी कशा- कशाची केली गेली? 
या संदर्भात आज मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहणार असून, लवकरात लवकर सर्व त्या प्रक्रिया पूर्ण करून मुलांच्या भवितव्याची होत असलेली हेळसांड थांबवा.सरकार यावर लवकर निर्णय घेईल अशी विनंती करणार आहे, असेही संभाजीराजे यांनी म्हटले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP SambhajiRaje meet Eknath Shinde about Sarthi organization