पुणे : खासदार काकडेंचे पायरीवर 'वेटिंग'; विठ्ठल दर्शनापासून वंचित

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 सप्टेंबर 2019

- रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मंडळाने पंढरपूर येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिराचा साकारला भव्य देखावा. 

पौडरस्ता (पुणे) : नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांच्या श्री साई मित्र मंडळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धावती भेट दिली. यावेळी खासदार संजय काकडे हेदेखील त्यांच्यासोबत होते. मात्र, नागरिकांच्या गर्दीमुळे त्यांना दर्शन न घेता पायरीवरच थांबावे लागले.

रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त मंडळाने पंढरपूर येथील विठ्ठल रूक्मिणी मंदिराचा भव्य देखावा साकारला आहे. हा देखावा पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. त्यातच मुख्यमंत्री फडणवीस यांनी धावती भेट दिली. त्यांच्या हस्ते आरतीही झाली. त्यानंतर झालेल्या गर्दीमुळे खासदार काकडेंना पायरीवरच थांबावे लागले. मात्र, संजय काकडे मंदिराबाहेर वाट पाहत उभे आहेत हे पाहून 'मुरलीधरा, भेटी देवेंद्रजी आले', मग आता 'संजयला विठू पावणारा का?' अशा प्रतिक्रिया उमटल्या. 

आरती झाल्यानंतर मोहोळ यांच्या हस्ते पूरग्रस्त सहाय्यतेसाठी पाच लाखांचा धनादेश 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'साठी सुपूर्द करण्यात आला.

दरम्यान, मुख्यमंत्री फडणवीस यांची धावती भेट घडवून आणण्यात यशस्वी झालेले मोहोळ तिकीटही नक्की मिळेल, अशी चर्चा सुरू झाली आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Sanjay Kakade not getting Darshan of Lord vitthal