खासदार सुप्रिया सुळेंनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे केली खास मागणी

निलेश बोरुडे 
Sunday, 10 January 2021

हवेली पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेली सध्याची गावे व नव्याने समाविष्ट होत असलेली गावे ही सिंहगड किल्ल्याच्या परिसरातीलच आहेत. सिंहगड किल्ला हा नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या त्याग व शौर्याचे प्रतीक आहे.

किरकटवाडी(पुणे) : पुणे ग्रामीण कार्यक्षेत्रातील हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नांदेड, किरकटवाडी, नांदोशी व खडकवासला ही चार गावे पुणे शहर पोलीस आयुक्तालयात समाविष्ट होत असल्याने हवेली पोलिस ठाण्याचे विभाजन होऊन ग्रामीण हद्दीतील इतर गावे जोडून नवीन पोलिस ठाण्याच्या निर्मितीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. या पोलीस ठाण्याला 'सिंहगड पोलीस ठाणे' असे नाव देण्यासंदर्भातचे निवेदन खासदार सुप्रिया सुळे यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दिले आहे.

हवेली पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेली सध्याची गावे व नव्याने समाविष्ट होत असलेली गावे ही सिंहगड किल्ल्याच्या परिसरातीलच आहेत. सिंहगड किल्ला हा नरवीर तान्हाजी मालुसरे यांच्या त्याग व शौर्याचे प्रतीक आहे. त्यामुळे नव्याने तयार होत असलेल्या पोलिस ठाण्याला सिंहगड पोलीस ठाणे असे नाव द्यावे अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस बारामती लोकसभा मतदारसंघ समन्वयक प्रविण शिंदे हेही उपस्थित होते.

 पुण्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा  

डोणजे किंवा खानापूर येथे पोलीस ठाणे व्हावे
सध्याची हवेली पोलिस ठाण्याची स्थिती 'आग रामेश्वरी आणि बंब सोमेश्वरी' अशी आहे. कारण ग्रामीणचे पोलीस ठाणे पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत आहे. ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ठिकाणापासून चार ते पाच किलोमीटर नंतर पुणे ग्रामीण पोलीस कार्यक्षेत्राची हद्द सुरू होते. एखादी अनुचित घटना घडल्यास पोलीस ठाण्यापासून संबंधित ठिकाणी पोहोचण्यास वाहतुकीचा अडथळा व अंतरामुळे पोलीस कर्मचाऱ्यांना विलंब होतो. त्यामुळे नव्याने तयार होणारे पोलीस ठाणे हे ग्रामीण पोलीस कार्यक्षेत्रात म्हणजेच डोणजे किंवा खानापूर अशा मध्यवर्ती ठिकाणी व्हावे अशीही मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी पत्राद्वारे गृहमंत्री आणि देशमुख यांच्याकडे केली आहे. 
 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MP Sule demand to Home Minister to Name the newly formed police station as Sinhagad