पुण्यातील रिक्षा स्टॅंडसाठी साताऱ्याच्या खासदारांचे विमान वाहतूक मंत्र्यांना साकडं !

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 September 2020

लोहगाव विमानतळाच्या आवारात गेल्या 30 वर्षांपासून सुरू असलेला प्री-पेड रिक्षा स्टॅंड कायम ठेवण्यासाठी खासदार श्रीनिवास पाटील यांनी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांना विनंती केली आहे.

पुणे ः लोहगाव विमानतळाच्या आवारात गेल्या 30 वर्षांपासून सुरू असलेला प्री-पेड रिक्षा स्टॅंड कायम ठेवण्यासाठी खासदार श्रीनिवास पाटील यांनी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांना विनंती केली आहे. हा स्टॅंड बंद झाल्यास प्रवाशांची गैरसोय होईल आणि सुमारे 400 रिक्षाचालक आर्थिक अडणीत सापडतील, असेही त्यांनी पत्रात म्हटले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लोहगाव विमानतळावर एल. व्ही. अंतराळ रिक्षा संघटनेतर्फे प्रवाशांसाठी प्री-पेड रिक्षाची सुविधा दिली जाते. मात्र, विमानतळाचे उपमहाव्यवस्थापक (वाणिज्य) महेशकुमार यांनी 18 ऑगस्ट रोजी संघटनेला पत्र पाठविले. त्यात प्री-पेड रिक्षा स्टॅंडशी केलेला करार संपुष्टात येत आहे. त्यामुळे 14 सप्टेंबरपासून स्टॅंड काढून घ्यावा, असे त्यांनी म्हटले आहे. प्रशासनाने 8 मार्च 2018 रोजी रिक्षा संघटनेशी दोन वर्षांसाठी करार केला होता.

त्यानंतर सहा महिन्यांसाठी त्याला मुदतवाढ देण्यात आली होती. ती संपुष्टात आल्यामुळे विमानतळाच्या आवारातील प्री-पेड रिक्षास्टॅंड काढून टाकावा, असे प्रशासनाने दिलेल्या पत्रात म्हटले आहे. रिक्षा संघटनेतर्फे या बाबत स्थानिक लोकप्रतिनिधींशी संपर्क साधून त्यांनी या बाबत मध्यस्थी करावी, अशी विनंती करण्यात आली होती. तसेच संघटनेने खासदार श्रीनिवास पाटील यांना पत्र पाठवून यामध्ये हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या पार्श्‍वभूमीवर पाटील यांनी केंद्रीय विमान वाहतूक मंत्री हरदीपसिंग पुरी यांना विमानतळाच्या आवारातील रिक्षा स्टॅंड कायम ठेवावा, अशी विनंती केली आहे. या बाबत विमानतळाचे संचालक कुलदीपसिंग यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी या बाबत अद्याप निर्णय झालेला नाही, असे स्पष्ट केले. तसेच विमानतळाच्या बाहेर रस्त्यावर रिक्षा संघटनेला प्री-पेड स्टॅंड सुरू करता येईल, असेही त्यांनी म्हटले आहे.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लोहगाव विमानतळावरून सध्या देशातील 14 शहरांसाठी वाहतूक होते. दररोज सुमारे 15 ते 18 हजार प्रवाशांची ये-जा होत असते. विमानतळाच्या आवारात ओला आणि उबरच्या कॅबला प्रशासनाने परवानगी दिली आहे. मात्र, आता रिक्षांना हुसकावून लावण्याचा प्रशासनाचा डाव आहे, असे संघटनेचे म्हणणे आहे.

(संपादन : सागर दिलीपराव शेलार)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MPs from Satara for rickshaw stand in Pune Meet the Minister of Air Transport