
पुणे - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या धरतीवरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) मुख्य परीक्षा वर्णनात्मक केली. विद्यार्थ्यांनी त्याचे स्वागतही केले. मात्र एमपीएससीने नुकत्याच घोषित अभ्यासक्रमाविरूद्ध विद्यार्थ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. अतिरिक्त दीड हजार गुणांचा अभ्यासक्रम आणि तयारीसाठी मिळणारी अवघे काही महिने, यामुळे हा अभ्यासक्रम अन्यायकारक आहे, अशी भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे.
एमपीएससीने २०२३ पासून मुख्य परीक्षेसाठी वर्णनात्मक पद्धतीचा अवलंब करण्याचे निश्चित केले आहे. मात्र नव्या अभ्यासक्रमाच्या तयारीसाठी दिलेली वेळ अपुरी असल्याचे उमेदवारांचे म्हणणे आहे. राजेश जाधव (नाव बदललेले) म्हणतात, ‘‘युपीएससीचा अभ्यासक्रम एमपीएससीने जसाच्या तसा कॉपीपेस्ट केला आहे. पर्यायाने आम्ही आजवर केलेला ७० टक्के अभ्यास आणि पुस्तके यापुढे काही उपयोगाचा नाही. त्यामुळे फक्त एमपीएससी करणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांना मोठा फटका बसणार आहे. याचा फायदा मात्र यूपीएससी करणाऱ्या दिल्लीतील मराठी विद्यार्थ्याला होणार आहे.’’ आयोगाच्या या निर्णयाविरोधात एमपीएससीचे विद्यार्थी सोमवारी (ता.२५) पुण्यात आंदोलन करणार आहे. शास्त्री रस्त्यावरील इंदुलाल कॉम्प्लेक्सजवळ विद्यार्थी जमणार आहेत.
विद्यार्थी म्हणतात...
१) नव्या अभ्यासक्रमाबद्दल ः
जुना आणि नव्या अभ्यासक्रमात ९० टक्के फरक
वैकल्पिक विषय, निबंध, नीतिशास्त्र असा एक हजार गुणांचा अतिरिक्त अभ्यासक्रम
९०० गुणांची परीक्षा आता २०२५ गुणांची झाली आहे
महाराष्ट्र केंद्रित अभ्यासक्रम आता जगाभोवती झाला आहे.
जगाचा भूगोल आणि इतिहासाच्या अभ्यासक्रमात वाढ
२) अडचणींबद्दल ः
नव्या अभ्यासक्रमाची संदर्भ पुस्तके उपलब्ध नाही
दीड हजार गुणांच्या अभ्यासासाठी किमान दोन ते तीन वर्ष लागतात
आजवर केलेला अभ्यास विसरून नव्याने तयारी करावी लागेल
लिखाणाची सवय नाही, तयारीसाठी अपुरा वेळ
एमपीएससी ऐवजी युपीएससीच्याच विद्यार्थ्यांना फायदा
२०२० पासून एमपीएससी मुख्य परीक्षेत सातत्याने बदल करत आहेत. आता केलेल्या बदलाला आमचा विरोध नाही. मात्र तयारीसाठी अपुर्ण वेळ दिल्याने एमपीएससीचे मुळ विद्यार्थी स्पर्धेतून बाहेर फेकले गेले आहे. आयोगाने नवा अभ्यासक्रम २०२५ नंतर लागू करावा.
- विक्रम गोटे (नाव बदललेले)
मत नोंदवा..
एमपीएससीने घोषित केलेल्या नव्या अभ्यासक्रमाबद्दल तुम्हाला काय वाटते? कळवा आम्हाला ८४८४९७३६०२ या व्हॉट्सअप क्रमांकावर.