व्यवस्था भ्रष्ट, हे आम्हालाही मान्य

व्यवस्था भ्रष्ट, हे आम्हालाही मान्य
Published on

पुणे, ता. १० : ‘‘महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेचा एक पेपर फुटल्याने विद्यार्थ्यांच्या मनात इतरही पेपर फुटले असण्याची शंका निर्माण झाली आहे. यातून विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नकारात्मकता वाढत आहे. ‘ही व्यवस्था कुठेतरी भ्रष्ट आहे’, हे आता सिद्ध होत असून, सरकारचा एक घटक म्हणून आम्हीही ते मान्य करतो,’’ अशी स्पष्ट कबुली आमदार विक्रम पाचपुते यांनी मंगळवारी पुण्यात दिली.
पुणे श्रमिक पत्रकार भवनात स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर आमदार पाचपुते यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी एमपीएससीची भरती प्रक्रिया, उमेदवारांच्या समस्या आणि राज्य सरकार करत असलेल्या उपाययोजनांवर सविस्तर भाष्य केले.
पाचपुते म्हणाले, ‘‘सद्यःस्थितीत आयोग, सरकार आणि विद्यार्थी यांच्यात संवादाचा मोठा अभाव आहे. सरकारचा एक प्रतिनिधी म्हणून मी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आहे. प्रशासकीय पातळीवरील विद्यार्थ्यांचे काही प्रश्न आम्ही कोणताही गाजावाजा न करता मार्गी लावले आहेत. आता विद्यार्थी प्रतिनिधींच्या शिष्टमंडळाने थेट मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्यासमोर आपल्या समस्या मांडाव्यात.’’ आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधताना पाचपुते म्हणाले, ‘‘आमच्याकडे पुरावे आहेत असे सांगून केवळ आरोप करत बसण्यापेक्षा पवार यांनी ते पुरावे तपास यंत्रणांना द्यावेत. त्यानुसार पुढील तपास करता येईल.’’

आयोगाचे निर्णय आधीच बाहेर कसे?
तत्पूर्वी, आमदार पाचपुते यांच्याशी झालेल्या संवादात स्पर्धा परीक्षार्थ्यांनी आयोगाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. परीक्षांचे कोलमडलेले वेळापत्रक आणि परीक्षांना होणारा विलंब यावर विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त केला. ‘‘एमपीएससीबाबतचे प्रश्न केवळ आम्हीच उपस्थित करायचे का आणि गैरप्रकारांचे पुरावेही आम्हीच शोधून द्यायचे का? एमपीएससी स्वायत्त संस्था म्हणून पूर्णपणे अपयशी ठरत आहे. आयोगाच्या निर्णयांची माहिती अधिकृतरीत्या जाहीर होण्यापूर्वीच समाजमाध्यमांत कशी काय पसरते?’’ असे संतप्त प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केले. विद्यार्थी आणि आयोग यांच्यात संवादाचा अभाव आहे, जर आयोगानेच विद्यार्थ्यांशी थेट संवाद निर्माण केला, तर राजकीय नेत्यांना विद्यार्थ्यांशी संवाद साधत फिरण्याची वेळच येणार नाही, अशी स्पष्ट भूमिका विद्यार्थ्यांनी या वेळी मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com