पंचनामा : दिव्याखाली अंधार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Panchnama

पंचनामा : दिव्याखाली अंधार

वीजमंडळाच्या ऑफिसमध्ये ग्राहकांच्या दोन रांगा लागल्या आहेत. एक बिल भरणाऱ्यांची व दुसरी वाद घालणाऱ्यांची. बिल भरणाऱ्यांची रांग मुंगीच्या गतीने शांतपणे पुढे सरकत चालली होती तर दुसऱ्या रांगेत आरडा-ओरड चालला होता. ‘आम्हाला असा ‘शॉक’ देणारे, तुम्ही स्वतःला समजता कोण?’ ‘तुम्ही काय दिवे लावलेत, ते माहिती आहे आम्हाला?’ ‘काय उजेड पाडायचा ते दिवे लावून पाडा.’ ‘तुमच्याशी विनाकारण भांडायला आमच्या डोक्याचा फ्यूज उडालाय का?’ ‘एवढं बिल भरायचं म्हणजे घर विकलं पाहिजे.’, ‘बिल भरण्यासाठी सुलभ हप्त्यावर कर्ज तरी पुरवा.’

प्रत्येकाची आवाजाची पट्टी वाढत असल्याने गोंधळात भर पडत होती. मात्र, तक्रार कक्षातील दोन कर्मचारी शांतपणे प्रत्येकाचे म्हणणे ऐकून घेत होते. बहिरेपणाच्या निकषावरच त्यांची या विभागात नियुक्ती झाली होती. भांडल्यानंतर ग्राहकाच्या घशाला कोरड पडायची. मात्र, त्यासाठी थंड पाण्याची सोय वीजमंडळाने केली होती, ही त्यातल्या त्यात दिलासादायक गोष्ट होती. जनुभाऊंनी तक्रार विभागात कर्मचाऱ्यांना दहा मिनिटे जाब विचारला. मात्र, दोघांचेही चेहरे शून्यात हरवल्यासारखे होते. त्यामुळे जनुभाऊंनी मोर्चा अधिकाऱ्याकडे वळवला. मात्र, जनुभाऊंकडं जेवढं दुर्लक्ष करता येईल, तेवढं दुर्लक्ष अधिकाऱ्याने केलं. त्यानंतर ‘काय पाहिजे?’ असं तुसडेपणाने विचारलं.

‘‘साहेब, तुमच्याकडे ‘पेशवाईतील लामणदिवे’ किंवा स्वातंत्र्योत्तर काळातील गॅसबत्ती आहे का’’? जनुभाऊंनी नम्रपणे विचारले.

‘‘हे वीजमंडळाचं कार्यालय आहे. या वस्तू तुम्ही दुकानातून खरेदी करा.’’

‘‘साहेब, या वस्तूंबरोबरच तुम्ही कंदील आणि रॉकेलवरील दिवे विका. तुमचं वीजमंडळ नफ्यात आलं नाही तर विचारा.’’ जनुभाऊंनी टोला मारला.

‘‘तुम्ही असे टोमणे मारू नका. तो अधिकार आमच्या साहेबांचा आहे. तुमची समस्या एक सेकंदात सांगा. मला अजिबात वेळ नाही.’’ अधिकाऱ्याने घड्याळाकडे पाहत म्हटले.

‘‘आमच्या घरातील वीज सारखी का जाते.?’’ जनुभाऊंनी विचारलं.

‘‘तुमच्या घरातील फॉल्टला आम्ही जबाबदार नाही? तुम्ही इलेक्र्टिशिअनकडून दुरुस्ती करून घ्या. उद्या तुमच्या घरातील भिंतीचा रंग गेल्यावर आम्हाला जबाबदार धराल.’’ अधिकाऱ्यानेही जशास तसे उत्तर दिले.

‘‘वीज काय फक्त आमच्या घरातीलच जात नाही. आमच्या परिसरातील जातेय. याला जबाबदार कोण’’? जनुभाऊंनी टेबलवर मूठ आपटत जाब विचारला.

‘‘अहो, कोळशाच्या टंचाईमुळे विजेचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.’’ अधिकाऱ्याच्या या उत्तरावर जनुभाऊंनी पिशवीतील कोळसा बाहेर काढला.

‘‘आमच्याकडील हा कोळसा घ्या. वीज वापरणाऱ्यांना कोळसा देण्याचे आवाहन करा. पण कृपया सारखी वीज घालवू नका. टीव्हीवरील सासू-सुनांची भांडणे बघता येत नाहीत. मग उगाचंच शेजाऱ्यांच्या घरात डोकवावे लागते.’’ जनुभाऊंनी समस्या सांगितली.

‘‘कोळसा नसल्यामुळे तुम्ही सारखी वीज घालवता. पण बिलं मात्र वेळच्यावेळी देता. हे कसं काय’’? जनुभाऊंनी विचारलं.

‘‘अहो आमच्याकडे कोळशाची टंचाई आहे. कागदाची नाही. एवढं लक्षात ठेवा.’’ अधिकाऱ्याने उत्तर दिले.

‘‘कोळशासारखी कागदाची टंचाई कधी येणार आहे.?’’ जनुभाऊंनी विचारले.

‘‘हे बघा, तुमच्या प्रत्येक प्रश्‍नाला उत्तर द्यायला मी बांधील नाही. तुमची काही तक्रार असल्यास ती तक्रार विभागात द्या. पुढील दोन- तीन वर्षात आम्ही त्यावर तोडगा काढायचा प्रयत्न करू.’’ अधिकाऱ्याने म्हटले. तेवढ्यात वीज गेली. त्यामुळे शिपायाने लगबगीने साहेबांच्या केबिनमधील दिव्याची वात पेटवली.

‘‘साहेब, ‘दिव्याखाली अंधार’ यालाच म्हणतात वाटतं. म्हणून म्हणतो, तुम्ही सवलतीच्या दरात कंदील व दिवे विकायला सुरवात करा. एकदम फायद्यात याल. शिवाय थकबाकीची चिंता राहणार नाही.’’ असे म्हणत जनुभाऊ केबिनबाहेर पडले.

loading image
go to top