esakal | म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचे हाल सुरुच; इंजेक्शनची वाणवा!
sakal

बोलून बातमी शोधा

Mucormycosis

म्युकरमायकोसिसच्या रुग्णांचे हाल सुरुच; इंजेक्शनची वाणवा!

sakal_logo
By
प्रशांत पाटील

पुणे - ‘म्युकरमायकोसिस’च्या रुग्णसंख्येत (Mucormycosis Patient) वाढ होत असताना केंद्र आणि राज्य सरकारकडून (State Government) पुण्याला (Pune) सोमवारी एकही ‘ॲम्फोटेरेसिम बी’ इंजेक्शन (Amphotericin B) मिळाले नाही. शिवाय, खासगी औषध कंपन्यांकडूनही जिल्हा प्रशासनाला ते उपलब्ध होऊ शकले नाही. त्यामुळे औषधांअभावी (Medicine) रुग्णांचे हाल होत आहेत. दुसरीकडे औषधेच उपलब्ध नाहीत तर, ती रुग्णालयांना कोठून द्यायची? असा प्रश्न जिल्हा प्रशासनाला पडला आहे.

पुणे, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील ग्रामीण भागात ‘म्युकरमायकोसिस’ या बुरशीजन्य आजाराच्या रुग्णांख्येत झपाट्याने वाढ होत आहे. जिल्हा प्रशासनाकडील आकडेवारीनुसार रविवारी ही रुग्णसंख्या ३९१ होती. हा आकडा सोमवारी ५४७ वर पोचला. जिल्हा प्रशासनाने रविवारी (ता. २३) औषध कंपन्यांच्या वितरकांकडून पाचशे ‘ॲम्फोटेरेसिम बी’ ताब्यात घेउन ती रुग्णालयांना पुरवठा केली. परंतु उत्पादनच कमी होत असल्यामुळे आज कंपन्यांकडून वितरकांना पुरवठाच झाला नाही. त्यामुळे एकही इंजेक्शन उपलब्ध जिल्हा प्रशासनाला उपलब्ध होऊ शकले नाही.

हेही वाचा: आंबेगाव : तपासणी न करताच कोरोनो रिपोर्ट

केंद्र सरकारकडून महाराष्ट्राला १६ हजार ५०० ‘ॲम्फोटेरेसिम बी’ इंजेक्शन उपलब्ध होणार आहेत. त्यापैकी राज्य सरकार पुणे जिल्ह्याला चार हजार सहाशे ‘ॲम्फोटेरेसिम बी’ इंजेक्शन देणार आहे. यापैकी बहुतांश इंजेक्शन सरकारी रुग्णालयांना उपलब्ध होणार आहेत. मात्र, तेही आज उपलब्ध झाले नाहीत.

जिल्हा प्रशासनाने रुग्णालयांना https://tinyurl.com/mmdpdh ही गुगल फॉर्म लिंक उपलब्ध करून दिली आहे. रुग्णालयांना या लिंकद्वारे दुपारी १२ वाजेपर्यंत रुग्णसंख्येच्या प्रमाणात मागणी नोंदविणे गरजेचे आहे. कोविड रुग्णालयांच्या यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी mmdpune1@gmail.com यावर इ-मेल करणे आवश्यक आहे. सरकारी रुग्णालयांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडून औषधे उपलब्ध करून घ्यावीत. तसेच, दररोजची मागणी जास्त असलेली रुग्णालये जिल्हा शल्यचिकित्सक यांच्याकडे मागणी नोंदवू शकतात, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.

‘म्युकरमायकोसिस’वरील ‘ॲम्फोटेरेसिम बी’ इंजेक्शन सोमवारी उपलब्ध झाले नाही. परंतु याबाबत जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांसाठी सोमवारी चार हजार पर्यायी गोळ्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. रुग्णांच्या नातेवाइकांना त्या गोळ्या संबंधित रुग्णालयांतून उपलब्ध होतील.

- विजयसिंह देशमुख, अतिरिक्त जिल्हाधिकारी

loading image