भिलार : पाचगणीत मुधोजी हायस्कूलचा ऐतिहासिक विजय; राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत मुला-मुलींच्या दोन्ही गटात दुहेरी मुकुट कोल्हापूर आणि अहिल्यानगरला उपविजेतेपदावर समाधान
मुधोजी हायस्कूलला दुहेरी विजेतेपद
पाचगणीमध्ये राज्यस्तरीय हॉकी स्पर्धा; कोल्हापूर संघास उपविजेतेपद
भिलार, ता. २२ : पाचगणी येथील संजीवन विद्यालयाच्या अत्याधुनिक आर्टिफिशियल टर्फवर आयोजिलेल्या ब्रिगेडियर आर. एल. राव स्मृतिप्रीत्यर्थ १४ वर्षांखालील राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत फलटणच्या मुधोजी हायस्कूलने आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे. या स्पर्धेच्या दुसऱ्या वर्षी मुला आणि मुली अशा दोन्ही गटांत विजेतेपद पटकावत मुधोजी हायस्कूलने २०२६ चे दुहेरी विजेतेपद आपल्या नावे केले.
मुलांच्या गटात झालेल्या अटीतटीच्या अंतिम सामन्यात मुधोजी हायस्कूल फलटणने कोल्हापूर हॉकी असोसिएशनच्या संघाचा ४-३ असा पराभव केला. या सामन्यात मुधोजी हायस्कूलच्या अनुराग शेलारने तीन गोल करून विजयात मोलाचा वाटा उचलला. प्रणव जाधवने एक गोल केला. कोल्हापूरच्या वतीने आर्यन भोसलेने दोन आणि रेहान पठाणने एक गोल करत विजयासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मुलांच्या गटात विमल गोएंका इंग्लिश मीडियम हायस्कूलने तिसरे, तर केएसडी शानभाग हायस्कूलने चौथे स्थान मिळवले.
मुलींच्या गटातही मुधोजी हायस्कूलने आपला दबदबा कायम राखत अहिल्यानगरच्या प्रवरा इंग्लिश मीडियम हायस्कूल, लोणीचा ५-१ अशा मोठ्या फरकाने पराभव केला. मुधोजीच्या आर्या महामने हिने शानदार तीन गोल केले. अनघा केंजळेने दोन गोल नोंदवले. प्रवरा शाळेकडून सई देशमुखने एकमेव गोल केला. या गटात फलटण हॉकी असोसिएशनला तृतीय, तर प्रिन्सेस पद्मराजे गर्ल्स हायस्कूलला चतुर्थ क्रमांक मिळाला.
स्पर्धेतील वैयक्तिक कामगिरीमध्ये मुलींच्या गटात उत्कृष्ट गोलरक्षक म्हणून राजवर्धिनी शिंदे, उत्कृष्ट बचावपटू म्हणून आर्या महांगरे आणि उत्कृष्ट फॉरवर्ड म्हणून श्रद्धा लबडे यांना गौरविण्यात आले. मुलांच्या गटात समर्थ घाटगे याला उत्कृष्ट गोलरक्षक, रेहान पठाण याला उत्कृष्ट बचावपटू आणि सानिध्य तांबेकर याला उत्कृष्ट फॉरवर्ड म्हणून पुरस्कार देण्यात आले.
कर्नल राजकुमार जाधव, संजीवन विद्यालय ट्रस्टच्या अध्यक्षा शशीताई ठकार, अनघा देवी आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण सोहळा झाला.
या वेळी कर्नल राजकुमार जाधव यांनी खेळाडूंना केवळ यशाचा विचार न करता कौशल्य विकासावर आणि फिटनेसवर लक्ष देण्याचे आवाहन केले. अनघा देवी यांनी संजीवन विद्यालयाने खेळाडूंसाठी तयार केलेल्या या व्यासपीठाचे कौतुक केले. या स्पर्धेसाठी क्रीडा प्रशिक्षक सचिन कांबळे यांनी विशेष परिश्रम घेतले. विनिता दाते यांनी प्रायोजक म्हणून मोलाची भूमिका बजावली. स्नेहल बेलोशे, पौर्णिमा पाटील आणि सुमेध बाचल यांनी सूत्रसंचालन केले.
फोटो आहे.
BHL26B07166, BHL26B07167
पाचगणी : विजेत्यांना बक्षीस वितरण करताना कर्नल राजकुमार जाधव, अनघा देवी व इतर. (रविकांत बेलोशे : सकाळ छायाचित्रसेवा)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

