वाढते जलप्रदूषण मुळा नदीच्या पुन्हा ‘मुळावर’

वाढते जलप्रदूषण मुळा नदीच्या पुन्हा ‘मुळावर’

Published on

पिंपळे गुरव, ता. ३ ः पिंपळे निलख चोंधे लॉन्स येथील मुळा नदी पात्रात विशालनगर ते बालेवाडी जोडणाऱ्या बंधाऱ्याजवळील विसर्जन घाट परिसरात कोणतीही प्रक्रिया न करता थेट मैलामिश्रित पाणी सोडले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. त्यामुळे पाण्याच्या पृष्ठभागावर मोठ्या प्रमाणात पांढऱ्या फेसाचे थर दिसत असून काही ठिकाणी काळसर रंगाचा मैलामिश्रित गाळ साचलेला आढळून येत आहे.
शहराच्या प्रमुख नद्यांपैकी एक असलेली मुळा नदी सध्या प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. काही महिन्यांपासून मुळा नदीपात्रात अस्वच्छ पाण्याचा ओघ सातत्याने वाढत आहे. सांडपाण्यातील रासायनिक घटक, डिटर्जंट्स आणि सेंद्रिय कचरा यामुळे पाण्यातील विरघळलेल्या ऑक्सिजनचे प्रमाण घटत असून जलजीवसृष्टीसाठी ही स्थिती अत्यंत घातक ठरत आहे. मासे व इतर सूक्ष्मजीवांच्या अस्तित्वावर याचा गंभीर परिणाम होत आहे. फेसाळलेले पाणी आणि असह्य दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याची भीती निर्माण झाली आहे. पर्यावरण संरक्षण कायद्यांचे स्पष्ट उल्लंघन होत असतानाही संबंधित विभागांकडून प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

पुनरुज्जीवनास विलंब
दूषित पाण्यातील विषारी घटकांचा प्रसार होऊन शेती, पिण्याच्या पाण्याचे स्रोत आणि भूजल यावर दुष्परिणाम होण्याचा मोठा धोका निर्माण झाला असून बंद पडलेले किंवा अपूर्ण क्षमतेने चालणारे जलशुद्धीकरण प्रकल्प, गळत्या जलवाहिन्या, सांडपाणी वाहिन्या आणि अवैध नाल्यांचे जाळे ही परिस्थिती अधिकच गंभीर करत आहेत. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडून नदी पुनरुज्जीवनासाठी विविध योजना जाहीर केल्या जात असल्या तरी प्रत्यक्षात कामांच्या अंमलबजावणीत विलंब होत असल्याचे चित्र आहे.

पर्यावरणप्रेमींच्या मागण्या
- नदी स्वच्छतेसाठी विशेष मोहीम राबवावी
- सांडपाण्याचे संपूर्ण शुद्धीकरण केले जावे
- अवैध सांडपाणी जोडण्यांवर कठोर कारवाई केली जावी
- जलनिस्सारण, पर्यावरण विभागाने संयुक्त पाहणी करावी
- दोषींवर दंडात्मक कारवाई करावी

जलप्रदूषण धोकादायक
शहरीकरणाच्या वाढत्या दबावामुळे नैसर्गिक जलस्रोतांचे संतुलन बिघडत चालले असून दीर्घकालीन दुष्परिणाम टाळण्यासाठी ठोस धोरण आवश्यक आहे. नागरिकांचे आरोग्य, जैवविविधता आणि पर्यावरणाचे संरक्षण यासाठी प्रशासनाने युद्धपातळीवर उपाययोजना राबवून मुळा नदीला वाढत्या प्रदूषणापासून मुक्त करण्याची गरज आहे.
जलप्रदूषणाची पातळी धोकादायक टप्प्यावर पोहोचल्याची भीती पर्यावरण कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे.


उपाययोजना काय ?
- विविध विभागांद्वारे तातडीची संयुक्त पाहणी करणे
- अवैध नाले बंद करुन योग्य पर्यायी व्यवस्था करणे
- सांडपाणी शुद्धीकरण सक्तीचे करणे
- बंद, अपूर्ण क्षमतेचे एसटीपी कार्यान्वित करणे
- औद्योगिक सांडपाणी तपासणी

निधी नेमका कुठे खर्च ?
महापालिका पर्यावरण विभागाच्या निष्क्रियतेमुळे परिस्थिती गंभीर बनली असून जबाबदारी निश्चित करून अनागोंदी कारभारावर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. पर्यावरण विभागाची वार्षिक तरतूद किती आणि तो निधी नेमका कुठे खर्च होतो ? त्याबाबतचे लेखापरीक्षण करून अहवाल सार्वजनिक करावा, अशा मागण्या नागरिकांकडून केल्या जात आहेत.

पिंपरी चिंचवड हद्दीत मुळा नदी आठ किलोमीटरपर्यंत वाहते. नदीतील फेस मुख्यतः वरच्या भागातून येणाऱ्या पाण्यामुळे निर्माण होत आहे. महापालिका हद्दीतील सांडपाणी मिश्रणाच्या ठिकाणी कामे सुरू आहेत. तक्रारीच्या ठिकाणी पाहणीसाठी विशेष पथक पाठविण्यात येत आहे. पाहणी अहवालानुसार पुढील कारवाई केली जाईल. कंपनी किंवा लॉन्ड्रीचे पाणी मिसळत असल्यास संबंधित आस्थापना सील करण्यात येईल.
- योगेश आल्हाट, कार्यकारी अभियंता, पर्यावरण नदी सुधार प्रकल्प

Marathi News Esakal
www.esakal.com