मुळशीत प्रशासनाचा आधार ''निराधार''

मुळशीत प्रशासनाचा आधार ''निराधार''
Published on

कोळवण, ता. १८ : मुळशी तालुक्यात मंजूर २० पैकी ७ आधार केंद्रे कागदावरच असून, काही केंद्रे नेमकी कुठे आहेत याची प्रशासनालाच माहिती नाही. दुसरीकडे, आधार अद्ययावत करण्यासाठी नागरिकांकडून अधिकच्या पैशांची मागणी होत असल्याने प्रशासकीय अनागोंदी आणि आर्थिक लूटमार यांचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
स्वराज्य पक्षाचे मुळशी तालुका प्रमुख राजू फाले यांनी तहसीलदारांकडे केलेल्या अर्जानंतर हा सर्व सावळा गोंधळ उघडकीस आला आहे. तहसीलदार विजयकुमार चोबे यांनी ५ ऑगस्टला दिलेल्या लेखी उत्तरातून ही धक्कादायक माहिती समोर आली. तालुक्यात मंजूर २० केंद्रांपैकी केवळ १३ केंद्रे सुरळीत आहेत. उर्वरित ७ केंद्रांपैकी काही केंद्रे मंजूर एका ठिकाणी आणि सुरू भलत्याच ठिकाणी आहेत, काही केंद्रे अद्याप सुरूच झालेली नाहीत, तर काही ठिकाणी ऑपरेटर उपलब्ध नाहीत. धक्कादायक बाब म्हणजे, काही केंद्रे नेमकी कुठे आहेत, याची माहिती खुद्द प्रशासनाकडेच उपलब्ध नाही. एकीकडे प्रशासकीय पातळीवर अनागोंदी सुरू असताना, दुसरीकडे आधार केंद्र चालकांकडून नागरिकांची आर्थिक लूट सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. तरी या बेजबाबदार कारभाराला आळा घालून नागरिकांची लूट थांबवण्यासाठी प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी मागणी जोर धरत आहे.


दृष्टिक्षेपात :
आधार केंद्र सुरळीतपणे सुरू असलेली ठिकाणे : थेरगाव येथे पाच, वाकड येथे दोन, भुगाव, दासवे, पिरंगुट, सुस, मारुंजी व कासारआंबोली येथे प्रत्येकी एक.
ऑपरेटर उपलब्ध नसल्याने पौड येथील मशीन सुरू नाही
सावरगाव येथील आधार केंद्र मंजूर असून ते तेथे सुरू नसून मंजूर ठिकाणाव्यतिरिक्त इतरत्र आधार सेंटर सुरू आहे
कोळवण व घोटावडे येथील आधार सेंटर मंजूर असूनदेखील त्या दोन्ही ठिकाणी अद्याप सुरू झालेले नाही
पोमगाव व मुठा येथे आधार सेंटर मंजूर ठिकाणी सुरू नसून ते इतर कोणत्या ठिकाणी सुरू आहे याची माहिती प्रशासनाला नाही
उपविभागीय अधिकारी मावळ मुळशी यांच्याकडील आधार मशीन कार्यान्वित होती; परंतु सध्या ऑपरेटर नसल्याने आधार मशीन बंद आहे.


या प्रश्नावर १५ सप्टेंबर २०२५ पासून पाठपुरावा करत आहे. ५ ऑगस्ट २०२६ला तहसीलदारांनी मला आधार सेंटरबाबत पत्र दिले आहे, मुळशी तालुक्यात आधार सेवा केंद्रे केवळ कागदावर आहेत. ज्या ठिकाणी अधिकृत केंद्रांना मंजुरी आहे, तिथे मशीन का नाहीत आणि त्या इतरत्र कुठे वापरल्या जात आहेत, याची आम्ही लवकरच पोलखोल करणार आहोत.
- राजू फाले, तालुका प्रमुख स्वराज्य पक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com