‘मुळशी धरणातून पाणी आधी मुळशीकरांना द्या’
पिरंगुट, ता. १८ : मुळशी धरणाचे २ टीएमसी पाणी आधी मुळशीकरांना द्या, नंतरच पुणे शहराला द्या, अशी मागणी मुळशी पंचायत समितीचे माजी सभापती रवींद्र कंधारे यांनी केली आहे. मुळशी धरणातील पाणी मुळशीसाठी न मिळाल्यास जलसमाधी आंदोलन करण्याचा इशारा
दिला आहे.
याबाबतचे लेखी निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जलसंपदामंत्री व संबंधित सर्व विभागांना देण्यात आले आहे. त्यानुसार, मुळशी तालुक्यातील टाटा कंपनीच्या मालकीच्या धरणातून तालुक्यातील नागरिकांना पिण्यासाठी मुळशी प्रादेशिक पाणी पुरवठा एक व दोन अशा दोन योजना राबविलेल्या आहेत. यापूर्वी महाराष्ट्र राज्य शासन व टाटा कंपनीमध्ये झालेल्या करारानुसार १.२ टीएमसी पाणी पिण्यासाठी व शेतीच्या सिंचनासाठी राखीव आहे. सदरचे पाणी अपुरे पडत आहे. त्यामुळे मुळशी प्रादेशिक टप्पा १ व २ व कोळवण खोऱ्यातील शेतीसाठी पाणी मिळावे म्हणून दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी वारंवार बैठका घेऊन सकारात्मक भूमिका घेतली होती. दरम्यान तांत्रिक व कायदेशीर तसेच पळवाटांचा आधार घेऊन या धरणातील पाणी शासनाने अद्याप उपलब्ध करून दिलेले नाही. यासाठी गेली ७ वर्षे सतत पाठपुरावा करूनही त्याची अद्यापपर्यंत दखल घेतलेली नाही. मात्र, मुळशी धरणातील ९ टीएमसी पाणी पुणे शहरासाठी देण्याचा निर्णय मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला आहे. मुळशी तालुक्याच्या गरजेचे पाणी वगळून उर्वरित पाणी पुणे शहरासाठी देण्यास आमची काहीही हरकत नाही. मात्र, आमच्या हक्काचे पाणी आम्हालाच राहिले पाहिजे.
आधी मुळशीकरांची पाण्याची मागणी पूर्ण करा, नंतरच पुण्याला पाणी द्या. आमच्यावर अन्याय करू नका. अन्यथा आंदोलन करू.
- शांताराम इंगवले, जिल्हा परिषद सदस्य

