esakal | मल्टिप्लेक्‍समधील खाद्यपदार्थ ‘गरमच’
sakal

बोलून बातमी शोधा

मल्टिप्लेक्‍समधील खाद्यपदार्थ ‘गरमच’

मल्टिप्लेक्‍समधील खाद्यपदार्थ ‘गरमच’

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

पुणे - मल्टिप्लेक्‍स चित्रपटगृहांतील खाद्यपदार्थ माफक दरात देण्याचा सरकारचा आदेश असताना चढ्या दरानेच त्यांची विक्री केली जात आहे. पाच रुपयांचे पॉपकॉर्न वीस रुपये आणि २० रुपयांचे सामोसे ६० रुपयांना प्रेक्षकांच्या माथी मारले जात आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी याविरोधात आंदोलन करून सरकारला जागे केले होते. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चित्रपटगृह मालकांसमोर ठेवलेल्या नऊ अटी मालकांनी मान्य केल्या होत्या. त्यातील एक अट खाद्यपदार्थांच्या किमतीविषयी होती. परंतु, हे प्रकरण न्यायप्रविष्ठ असल्याने न्यायालयाचा निकाल येईपर्यंत किमती अशाच राहतील, असे चित्रपटगृहांकडून सांगण्यात आले. 

या प्रकरणावरून मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला धारेवर धरले होते. राज्यातील सर्व मल्टिप्लेक्‍स चित्रपटगृहांमधील खाद्यपदार्थांच्या किमतींवर राज्य सरकारचे नियंत्रण का नाही? बॉम्बे पोलिस कायद्यानुसार चित्रपटगृह मालकांवर कारवाई करता येईल का? याविषयी भूमिका स्पष्ट करण्याची सूचना न्यायालयाने सरकारला दिली होती.

मल्टिप्लेक्‍समध्ये बाहेरील खाद्यपदार्थ घेऊन येण्यास बंदी नसल्याचे राज्य सरकारने स्पष्ट केले होते. असे केल्यास चित्रपटगृहांवर कारवाई केली जाईल, असे राज्य सरकारने १३ जुलैला विधिमंडळात स्पष्ट केले होते. याप्रकरणी जैनेंद्र बक्षी आणि ॲड. आदित्य प्रताप यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

चित्रपटाच्या नावाखाली प्रेक्षकांची लुटमार सुरू आहे. एवढी आंदोलने करूनही खाद्यपदार्थ चढ्या दरानेच विकली जात आहेत. प्रकरण न्यायालयात असल्याने दर असेच राहणार, असे आम्हाला सांगण्यात आले. याविषयी तक्रार करण्याचे कोणतेही साधन नाही. 
- भाऊसाहेब कुंजीर, प्रेक्षक

loading image