
तालुका प्रशासनाच्या वतीने सुरु केलेल्या बहुद्देशीय सुविधा केंद्रातून सर्वसामान्य नागरिकांना कोरोनाच्या बाबतीमधील सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळणार असल्यामुळे नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.
भोर (पुणे) ः नागरिकांना कोरोना आजाराच्या बाबतीत हॉस्पिटल व इतर शासकीय माहिती देण्यासाठी तालुका प्रशासनाच्या वतीने भोरमध्ये बहुउद्देशीय सुविधा केंद्र सुरु करण्यात आले असल्याची माहिती तहसीलदार अजित पाटील यांनी दिली.
शहरातील राजवाडा चौकातील भारतीय स्टेट बॅंकेच्या जुन्या जागेत हे केंद्र गुरुवार (ता. १) पासून कार्यांन्वित करण्यात आले आहे. कोरोनाच्या कालावधीत हा कक्ष चोविस तास सुरु राहणार असून यासाठी ६८ कर्मचा-यांची नेमणूक करण्यात आली आहे. रोटेशन पध्दतीने चोवीस तास कक्ष सुरु राहणार असल्यामुळे नागरिकांना केंव्हाही माहिती मिळणार आहे.
बहुउद्देशीय कक्षात एकून सहा कक्ष सुरु करण्यात आले आहेत. यामध्ये रुग्णवाहीका सुविधा कक्ष, बेड उपलब्ध कक्ष, शासकीय योजना माहिती कक्ष, वैद्यकीय बील तपासणी कक्ष, क्षेत्र सर्व्हे नियंत्रण कक्ष व समन्वय प्रमुख कक्ष आदींचा समावेश आहे. यासाठी नागरिकांनी ०२११३-२२४१३० व ०२११३-२२२५३९ या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले. याशिवाय तहसीलदार अजित पाटील, गटविकास अधिकारी विशाल तनपुरे व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सूर्यकांत क-हाळे यांच्याशी संपर्क साधावा असेही
सांगण्यात आले. कोरोनाग्रस्तांना रुग्णवाहीका हवी असल्यास, हॉस्पिटलमधील उपलब्धता, हॉस्पिटमधील
आकारलेले जादा बील व त्यासंबंधी शासकीय माहिती नागरिकांना मोफत मिळणार आहे.
नागरिकांमधून स्वागत- तालुका प्रशासनाच्या वतीने सुरु केलेल्या बहुद्देशीय सुविधा केंद्रातून सर्वसामान्य नागरिकांना कोरोनाच्या बाबतीमधील सर्व माहिती एकाच ठिकाणी मिळणार असल्यामुळे नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत केले आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना हवी असलेली माहिती त्वरित मिळाल्यानंतर त्यांना पुढील कार्यवाही करण्यास विलंब
होणार नाही. तालुक्यात प्रथमच हा चांगला उपक्रम सुरु केल्यामुळे प्रांताधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी
व तालुका वैद्यकीय अधिकारी यांचे ग्रामीण भागातून कौतुक होत असल्याचे सरपंच परिषदेच्या अध्यक्षा रेखा
टापरे यांनी सांगितले.
(संपादन ः सागर दिलीपराव शेलार)