Corona: रुग्णांसाठी बेडचा ‘मुंबई पॅटर्न’ राज्यभर; मुख्य सचिवांनी दिली माहिती

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 8 April 2021

कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात सर्वाधिक रुग्णवाढ महाराष्ट्रात होत आहे. ही रुग्णवाढ थांबवण्यासाठी राज्य सरकार अनेक उपाययोजना करीत आहे.

मुंबई : कोरोना रुग्णांना रुग्णालयातील खाटा उपलब्ध करून देणारी मध्यवर्ती यंत्रणा मुंबई महापालिकेने तयार केली. त्यामुळे रुग्णांना खाटा मिळण्यात फार कमी अडचणी येतात. अशाच प्रकारे राज्यभर यंत्रणा निर्माण व्हावी, यासाठी मुंबई महापालिका पॅटर्न सर्वत्र राबवण्याचा निर्णय झाल्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी सांगितले. दरम्यान, साथीच्या आजाराचा मुकाबला करण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन हा लढा यशस्वी करूया, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बुधवारी (ता.७) केले.

आरोग्यविषयक माध्यम प्रतिनिधींशी मुख्यमंत्र्यांनी दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला. या वेळी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, मुख्य सचिव सीताराम कुंटे आदी उपस्थित होते. या वेळी माध्यम प्रतिनिधींनी कोरोना नियंत्रणाबाबत, आरोग्य व्यवस्था, औषधांची उपलब्धता, कोरोना चाचण्या, लसीकरण आदी विविध मुद्द्यांवर अनुभवकथन करतानाच काही सूचनाही केल्या. त्या सूचनांचे स्वागत करतानाच हा संवाद यापुढेही कायम ठेवण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.

'कोरोनाला नमवण्यासाठी लसीकरण हा एक उपाय'; PM मोदींनी घेतला दुसरा डोस​

नियमावलीची माहिती सोप्या भाषेत द्यावी
ठाकरे म्हणाले की, कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्यात सर्वाधिक रुग्णवाढ महाराष्ट्रात होत आहे. ही रुग्णवाढ थांबवण्यासाठी राज्य सरकार अनेक उपाययोजना करीत आहे. नियमावली जाहीर केली आहे. लोकांना त्याविषयी सोप्या भाषेत माहिती देताना कोरोना नियंत्रणासाठी अनावश्यक गर्दी टाळणे, मास्क वापरणे, सुरक्षित अंतर ठेवणे या सूचनांचे पालन करणे किती आवश्यक आहे हे समजून सांगायची आवश्यकता आहे. माध्यमांनी जनजागृती करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी या वेळी केले.

दारु आणि इंग्रजी बोलण्याचा संबंध आहे का? ब्रिटनमध्ये झालं संशोधन​

कोरोनाच्या लढ्यात माध्यमांचा सहभाग महत्त्‍वाचा
कोरोनाविरुद्धची लढाई एकट्या सरकारची नसून त्यात सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. लसीकरणाच्या पहिल्या आणि दुसऱ्या मात्रेनंतर किती जणांना पुन्हा कोरोनाची बाधा झाली, याविषयी अभ्यास करण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी आरोग्य विभागाला केल्या.

राज्य कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात आघाडीवर असून त्याला वेग येण्यासाठी महाराष्ट्राला दर आठवड्याला ४० लाख मात्रा देण्याची आग्रही मागणी केंद्र सरकारकडे केली आहे.
- राजेश टोपे, आरोग्यमंत्री

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mumbai pattern of providing beds to Corona patients implemented across state informed Chief Secretary