मुंबईच्या अंडरवर्ल्डमधला शार्प शुटर बनला मॅरेथॉन पटू 

मुंबईच्या अंडरवर्ल्डमधला शार्प शुटर बनला मॅरेथॉन पटू 

येरवडा: व्यसनाच्या आहारी गेलेला आणि गुन्हेगारी जगताशी संबंधीत व्यक्तीच्या छंदाचे ध्येयात रुपांतरीत झाले तर काय जादू होऊ शकते याचा प्रत्यक्ष अनुभव नुकताच आला. मुक्तांगणमधील व्यसनाधीन रुग्णांनी आणि निमंत्रीत पाहुण्यांनी हा अनुभव घेतला.

मुक्तांगण मित्रतर्फे आयोजित मुंबईतील गेटवे ऑफ इंडियापासून ते दिल्लीच्या इंडिया गेटपर्यंतची मॅरेथॉन यशस्वीपणे पार करणाऱ्या राहुल जाधव यांच्या सत्कार आणि मुलाखतीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ मनोविकासतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी यांनी राहुल जाधव यांच्याशी संवाद साधला. यावेळी मोर्डे फूडसचे संचालक हर्षल मोर्डे, मुक्तांगणच्या संचालिका मुक्ता पुणतांबेकर उपस्थित होते.

राहूल म्हणाले,‘‘ एकेकाळी मी मुंबईच्या अंडरवर्ल्डमध्ये शार्प शुटर म्हणून कुप्रसिद्ध होतो. आर्थररोड कारागृहात शिक्षा भोगून आल्यानंतर एक व्यसनाधीन, वाया गेलेला तरूण म्हणून बोट दाखवले जायचे. पण पुण्यातील मुक्तांगणच्या वास्तव्यामुळे व्यसनापासून मुक्त झालो. यामुळे जगण्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलला. त्यामुळे व्यसनाबरोबरच गुन्हेगारीपासूनही मुक्त होण्याचा निर्णय घेतला. ’’

व्यसनमुक्तीचा संदेश घराघरात पोहोचविण्यासाठी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र आणि मोर्डे फूडस् यांच्या संयुक्त विद्यमाने मुंबई-दिल्ली ‘दी ऍडिक्शन अल्ट्रा मॅरेथॉन २०१९’चे आयोजन करण्यात आले होते. मुंबईतील गेटवे ऑफ इंडियापासून ते दिल्लीच्या इंडिया गेटपर्यंतचे सुमारे दीड हजार किलो मीटरचे अंतर वीस दिवसांच्या कालावधीत पार केले. दिवसाला सरासरी ८० किलो मीटर अंतर पार करताना मनात एकच जिद्द होती, ती म्हणजे आपल्या माध्यमातून इतर व्यसनाधीन व्यक्तींना सकारात्मक संदेश देण्याची.

आयुष्यातील खूप मोठा निर्णय होता. या सगळ्या सवयी सकारात्मक सवयींमध्ये बदलण्यासाठी समुपदेशनाचा खूप उपयोग झाला. धावणे हा क्रीडा प्रकार आवडत असल्याने त्यावर लक्ष केंद्रित केले. त्यामुळे शरीर आणि मनाला देखील चांगला व्यायाम मिळाल्याचे जाधव यांनी सांगितले.

‘‘ज्या वातावरणात राहण्याची, तिथली भाषा बोलण्याची, शस्त्राच्या माध्यमातून व्यक्त होण्याची सवय लागली होती. त्या सगळ्या सवयींना मुरड घालणे, समाजाच्या मुख्य प्रवाहात येताना आजुबाजूच्या लोकांना तोंड देणे, परिस्थितीशी मिळते-जुळते घेणे या सगळ्या गोष्टी करणे निश्चितच सोपे नव्हते.’’
- राहुल जाधव,

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com