राणी सावंत यांची यशोगाथा

राणी सावंत यांची यशोगाथा

Published on

मुंबईकरीन बनली शेतकरीण

राणी सावंत यांच्‍या कष्‍टाने
कळसकरवाडीत फुलला मळा

रूपेश कदम : सकाळ वृत्तसेवा

लग्न करून मुंबईला गेल्यावर काही वर्षांनी मुंबईत संसाराचा गाडा हाकणं जिकिरीचं बनलं. इथं आपलं अन् लेकराबाळांचं हाल होणार हे लक्षात येताच घरधन्याला विश्वासात घेऊन गावाकडं परतण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय सार्थ ठरविताना एकेकाळची मुंबईकरीन प्रयोगशील पशुपालक शेतकरीण बनली. अशी ही यशोगाथा आहे माण तालुक्यातील कुळकजाई येथील कळसकरवाडीच्या राणी विनोद सावंत यांची.
राणी सावंत यांचं लग्न २००७ मध्‍ये झालं. लग्नानंतर एक महिन्यात त्या मुंबईला गेल्या. संसार सुरू झाला, दोन मुलं झाली; पण पतीला तेवढी चांगली नोकरी नसल्याने मुंबईत खर्च भागत नव्हता. त्यामुळे त्यांनी आपण गावी जाऊन शेती करू, असं पतीला सांगितलं. पतीला शेतीचा एवढा अनुभव नव्हता; पण राणी यांना होता. त्यामुळे एकमेकांच्या साथीने शेती करण्याचा निर्णय घेऊन २०११ मध्‍ये त्‍यांनी मुंबई सोडली व गावाची वाट धरली.
राणी ह्या गावी आल्या तर खरं पण शेती तेवढी सोपी नव्हती. सहा एकर क्षेत्र असले, तरी पाण्याची टंचाई जाणवायची अन् उत्पन्न सुद्धा जेमतेम निघायचे. त्यामुळे शेतीला पूरक व्यवसाय म्हणून एक जर्सी गाय घेतली. संसाराची ओढाताण सुरूच होती. मात्र कष्टाला अनुभवाची जोड दिल्याने हळूहळू परिस्थिती बदलू लागली. पैशांची जुळवाजुळव करून शेतात गायींसाठी गोठा बांधला. पाण्यासाठी विंधन विहीर घेतली. बघता बघता एका गायीपासून सुरू झालेला दुग्ध व्यवसाय आज पंधरा गायींपर्यंत पोहचला. याच दुग्ध व्यवसायामुळे संसार व मुलांचे शिक्षण उत्तम प्रकारे सुरू आहे.
जिद्द, चिकाटी, कष्ट करण्याची तयारी असेल तर शेतीतून सुद्धा चांगलं यश मिळवता येतं हे राणी सावंत यांनी आपल्या उदाहरणातून दाखवून दिलं आहे.

........................................

असा घडला प्रवास
जर्सी सोबतच घरी दूध दुभत्यासाठी देशी गायींची खरेदी
शेतीसाठी शेणखताचा वापर, जमिनीचा पोत सुधारण्‍यास मदत
गोबर गॅसमुळे स्वयंपाकासाठीच्या इंधनात बचत अन्‌ उत्पन्नात वाढ
२०२३ मध्‍ये पाणी फाउंडेशनचे प्रशिक्षण घेऊन शेतकरी गटाची निर्मिती
प्रशिक्षणामध्ये शिकवलेल्या पद्धतीने सेंद्रिय शेतीस प्रारंभ
औषधांची बचत करून उत्पादनात दुप्पटीने वाढ.
वाटाणा, कांदा यासारख्या पिकातून फायदा घेत, पपई, घेवडा, झेंडू, चवळी, मूग तसेच भाजीपाल्यास प्राधान्‍य.

................................

मुंबईहून गावाकडे परतण्याचा निर्णय कष्टातून सार्थ ठरवला. २०२४ मध्‍ये पाणी फाउंडेशनचा ‘फार्मर कप’ आमच्या महिला शेतकरी गटाला मिळाला आहे. दुग्ध व्यवसाय व शेतीतून संसार उभा करतानाच सामाजिक प्रतिष्ठा मिळवता आल्याचा माेठा आनंद, अभिमान आहे.
- राणी सावंत,
प्रगतशील शेतकरी, कळसकरवाडी (ता. माण)
................................................
छायाचित्र
MLV26B07349 & MLV26B07350 & MLV26B07351
राणी सावंत
...................................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com