
Pune News : लावणी जपण्यासाठी शिंदे- फडणवीस सरकारचा निर्णय, सांस्कृतिक मंत्र्यांची पिंपरीत मोठी घोषणा
पिंपरी : ''लावणी ही मराठी मनाचे वैभव आहे. महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. ही पारंपारिक लावणी जपण्यासाठी मोठा लावणी महोत्सव घेऊ'', असे राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केले.
आमदार उमा खापरे आणि महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेत्या सुलभा उबाळे यांच्यातर्फे चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात दोन दिवसीय राज्यस्तरीय महालावणी स्पर्धेच्या पारितोषिक वितरण प्रसंगी ते बोलत होते.
खासदार श्रीरंग बारणे, माजी मंत्री महादेव जानकर, ज्येष्ठ नृत्यांगना लीला गांधी, माया जाधव, ज्येष्ठ कथ्थक नर्तक डॉ. नंदकिशोर कपोते, उपस्थित होते. लावणीसम्राज्ञी सुरेखा पुणेकर व अभिनेत्री मेघा घाडगे यांनी परीक्षण केले. नृत्यांगना संजीवनी मुळे नगरकर व सीमा पोटे नारायणगावकर यांना पुरस्कार देऊन गौरविले. लोककला जपण्यासाठी लावणी स्पर्धेचे आयोजन केल्याचे आमदार खापरे यांनी सांगितली.
लावणी स्पर्धेत 'कैरी पाडाची', 'राजसा तुम्हासाठी', 'साज' आणि 'जल्लोष अप्सरांचा' यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय, तृतीय व उत्तेजनार्थ पारितोषिक पटकावले. सर्वोत्कृष्ट नृत्यांगना म्हणून सोनाली जळगावकर यांचा गौरव केला. मुनगंटीवार म्हणाले, ''आमदारांना सांगून प्रत्येक जिल्ह्यात लावणी महोत्सव घेण्यास सांगू. छत्रपती शिवाजी महाराज यांचा ३५० वा राज्याभिषेक दिन सोहळा साजरा करणार आहोत.''