महापालिका आणि जलसंपदाच्या वादात पुणेकर वेठीस

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

महापालिका आणि जलसंपदा खात्याच्या वादात बहुतांश नागरिक पाण्याच्या समस्येमुळे त्रस्त झाले आहेत. पालकमंत्री गिरीश बापट यांच्यापासून नगरसेवकांपर्यंत सगळेच जण पाणीकपात होणार नाही, असे आश्‍वासन देत असले, तरी प्रत्यक्षात ‘पाण्यासाठी दाही दिशा’ असे सध्या चित्र शहरातील बहुतांश भागांमध्ये दिसत आहे. या वास्तवाचे ‘सकाळ’ने केलेले वार्तांकन...

कोथरूड - योग्य नियोजनाचा अभाव
महापालिका आणि पाटबंधारे विभागाचा आपापसांत समन्वय कमी असल्याने शहराच्या पाण्याचे योग्य नियोजन करण्यात अपयश आल्यानेच शहरावर पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले आहे. शहराला २४ तास पाणीपुरवठा करण्याचा दावा गेल्या काही वर्षांपासून सातत्याने केला जातो. मात्र शहरात दरवर्षी पाणीकपातीचा प्रश्न उभा राहतो. याला प्रशासकीय अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधीही तितकेच जबाबदार आहेत. कोथरूड भागामध्ये गेल्या चार वर्षांपूर्वी भयानक पाणीटंचाई निर्माण झाली होती. त्या वेळी पाण्याचे नैसर्गिक स्रोत शोधून ते पाणी वापरात आणण्याची घोषणाही काही काळातच हवेत विरली आहे. 

औंध - वेळेतील बदलाने त्रस्त
पाणीपुरवठ्याच्या वेळेत अचानक बदल केल्याने औंध भागातील  नागरिकांची गैरसोय होत आहे. विशेषतः औंध गावठाण, दर्शन पार्क सोसायटी, मलिंग चौक भाग, गोळवलकर शाळेजवळील परिसरातील नागरिक वेळेच्या बदलामुळे त्रस्त झाले आहेत. दुपारी तीन ते पहाटे पाचपर्यंत होणारा पाणीपुरवठा अचानक सणासुदीच्या काळात सायंकाळी सहानंतर बदलल्याने पाणी भरायला एकच झुंबड उडत आहे.  

पौड रस्ता  - विस्कळीत पाणीपुरवठा
कोथरूड परिसरातील जयभवानी नगर, केळेवाडी परिसरात पाणी पुरवठा विस्कळित झाला आहे. जयभवानीनगरमध्ये साडे दहानंतर पाणी येते.  याबाबत पाणीपुरवठा विभागाचे एस. एम. भांगरे म्हणाले, की केळेवाडी व एसएनडीटी टाकीत पुरेसे पाणी येत नसल्याने कोथरूडमधील पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. 

सहकारनगर - लक्ष्मीनगर भागात अपुरा पाणीपुरवठा
लक्ष्मीनगर येथील महात्मा फुले वसाहत, शाहू वसाहत, पर्वती दर्शन, शिवदर्शन या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिक विद्युत मोटार लावून पाणी घेत आहेत. त्यामुळे इतरांना पाणी मिळत नाही, अशी तक्रार या भागातील महिलांनी केल्या आहेत. सहकारनगर परिसरात पाणी येते; परंतु ठरलेली वेळ पाळली जात नाही. वाळवेकर नगर येथेही वेळेवर पाणी येत नाही.

एरंडवणे - आठवड्यापासून विस्कळित पाणीपुरवठा
 शीवतीर्थनगर, परमहंसनगर भागांत आणि एरंडवणे भागात अनेक ठिकाणी काही वेळा पाण्याचा पुरवठा विस्कळित होत होता. केळेवाडी भागात गेले ३ ते ४ दिवस पाणीपुरवठा विस्कळित आहे. केळेवाडीमध्ये प्रत्येकाच्या घरात महानगरपालिकेचा नळ आहे. परंतु पुरेसे पाणीच येत नाही. कोथरूडमधील सुनीता पार्क, गजानन सोसायटी यांसारख्या सोसायट्यांमध्ये सोमवारी पाणी आलेच नाही. 

घोरपडी - मर्जीतल्या लोकांना टॅंकरचे पाणी प्रथम 
परिसरात मोठ्या प्रमाणात पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. कालवा फुटल्यानंतर चार दिवस दुष्काळी भागात राहत आहोत की काय, असे वाटत होते.  टॅंकरने पाणीपुरवठा काही भागांत सुरू आहे, परंतु त्यातही राजकीय नेते त्यांच्या मर्जीतील लोकांना प्रथम देतात. त्यानंतर इतरांना पुरवठा केला जात असल्याचे  स्थानिक रहिवासी अरुणा कापसे यांनी सांगितले.

पाण्यामुळे दिनक्रमच बदलला
वानवडी ः परिसरात कमी दाबामुळे मिळणाऱ्या अपुऱ्या पाण्यामुळे नागरिकांचे मोठे हाल होत आहेत. इतर कामे सोडून पाण्यासाठी वेळ द्यावा लागत आहे.  गावठाणातील अनेक घरे खोलगट भागात असूनही पहिल्या मजल्यावर पाणी येत नाही. सकाळी घाईच्या वेळेत पाणी उपलब्ध नसल्यामुळे सर्व दिवसाचा दिनक्रमच बदलत असल्याची प्रतिक्रिया दिनेश होले यांनी दिली. 

बिबवेवाडी - दुसऱ्यांच्या घरातून भरावे लागते पाणी 
गावठाणासह बिबवेवाडी परिसरातील अप्पर, पापळवस्ती, बिबवेवाडी ओटा, शेळकेवस्ती, शिवतेज नगर, बकुळनगर, पोकळेवस्ती, प्रेमनगर, आंबेडकरनगर, आनंद नगर, ढोलेमळा, व डायसप्लॉट या वस्त्या टेकडीच्या उंचसखल परिसरात असल्याने येथे पाण्याची समस्या आहे. तसेच रम्यनगरी सोसायटी, पार्श्‍वनाथ नगर, वसंतबाग सोसायटी, महेशसोसायटीमध्ये नागरिकांना पिण्याव्यतिरिक्त इतर कामांसाठी पुरेसे पाणी मिळत नाही. काहीवेळेस दुसऱ्याच्या घरातून पाणी भरावे लागत असल्याचे अप्पर येथील माणिक सावंत यांनी सांगितले. 

मुंढवा - पुरेसे पाणी उपलब्ध करावे
गेल्या काही दिवसांपासून मुंढवा भागात पुरेसे पाणी मिळत नाही. पुरेसे पाणी उपलब्ध करून देण्याची मागणी नागरिकांनी केली   फ्रेन्ड्‌स एन्क्‍लेव्ह सोसायटी, सर्वोदय कॉलनी, मुंढवा गावठाण, गवळी आळी, गांधी चौक परिसरात मात्र, कालवा फुटल्यावर तीन दिवसांनी कमी दाबाने, तर काही वेळेला पाणीच आलेले नाही. त्यामुळे या भागातील नागरिक विशेषतः महिला त्रस्त झाल्या आहेत. 

वारजे - पठारावर पाण्याची कमतरता
वारजे भाग हा सोसायटी व पठार तसेच झोपडपट्टीचा भाग म्हणून ओळखला जातो. या भागात काही सोसायट्या सोडल्या, तर अनेक भागांत पाणीपुरवठा सुरळीत आहे, मात्र पठारावरती पाणीपुरवठ्याची कमतरता दिसून येते.वारज्यातील गोकुळनगर, सहयोगनगर पठारावर पाणी दिवसा आणि कमी दाबाने येत असल्याने या पठारावरील रहिवाशांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येचा सामना करावा लागत आहे. भर दुपारी व सायंकाळी पाच सहा वाजेच्या दरम्यान पाणी येत असल्याने अनेक नागरिक घराबाहेरच असतात त्यामुळे या नागरिकांना नंतर पाण्यासाठी वणवण भटकावे लागते. एकंदरीत वारज्यातील सोसायटीमध्ये पाणीपुरवठा सुरळीत आहे. मात्र येथील झोपडपट्टी पठारावरील भागांमध्ये पाण्याची टंचाई जास्त प्रमाणात दिसून येते.

धायरी-  समाविष्ट धायरीगावात वर्षभरानंतरही ‘जैसे थे’
नऱ्हे ग्रामपंचायत तसेच समाविष्ट धायरी गाव या भागात सर्वत्रच पाणीसमस्या तीव्र आहे. वर्ष झाले तरी पालिकेने कोणतीही सोय केली नसल्याने परिस्थिती जैसे थे आहे. नऱ्हे ग्रामपंचायत परिसरात मध्ये मोठे मोठे गृहप्रकल्पाचे जाळे पसरलेल्या मानाजी नगर, इंगळे वस्ती, पारी कंपनी, नऱ्हे गावठाण परिसरात ग्रामपंचायतीचे पाणीच नसल्याने नागरिकांचे खूपच हाल होत आहेत. गावठाणास, दिवसाआड पाऊण तास तेही कमी दाबाने येते. नऱ्हे ग्रामपंचायतीची जीर्ण पाइपलाइनने पाणीपुरवठा व्यवस्था ग्रामपंचायतने चालू ठेवली असून, विहिरीतील दूषित पाण्याबाबत ग्रामस्थांकडून वारंवार तक्रारी होत आहेत.

भूगाव  - पाच किलोमीटरची पायपीट
भूगावमध्ये ग्रामस्थांना घरापासून दोन ते पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या रामनदीजवळील महानगरपालिकेच्या नळकोंडाळ्यावरून पाणी आणावे लागते. तिथून दुचाकी, चारचाकी गाडीवरून हंड्यांत किंवा ड्रममध्ये भरून पाणी आणावे लागते. 

केशवनगर - कमी दाबाने पाणी
केशवनगर येथे एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. कालवा फुटल्यानंतर पाणी कमी दाबाने मिळत असल्याने, महिलांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. त्यामुळे महिलांकडून संताप व्यक्त केला जात आहे.  सध्या कमी दाबाने व अपुऱ्या होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे शिंदे वस्ती, लडकत रस्ता, म्हसोबानगर, हनुमाननगर, आनंदनगर व पवार वस्ती या भागांत काही ठिकाणी पाणीच येत नाही. 

आंबेगाव - पालिकेच्या निष्क्रियतेने टॅंकर        
समाविष्ट आंबेगाव भागात वर्ष झाले तरी पालिकेने कोणतीही सोय केली नसल्याने परिस्थिती ‘जैसे थे’ आहे. आंबेगाव बु।। मध्ये इमारतींचे जाळे पसरलेल्या आंबेगाव पठार, धबाडीवस्ती, तुकारामनगर, सिंहगड शाळा परिसरात पालिकेचे पाणीच नसल्याने नागरिकांचे प्रचंड हाल सुरू आहेत. गावठाणास पाणी दिवसाआड पाऊण तास, तेही कमी दाबाने येते. आंबेगाव खुर्द ग्रामपंचायतीची जुन्याच विहिरीतील पाणीपुरवठा व्यवस्था पालिकेने सुरू ठेवली असून, विहिरीतील दूषित पाण्याबाबत ग्रामस्थांच्या वारंवार तक्रारी होत आहेत. शनिनगर, लिपाणेवस्ती, दळवीनगर, सिद्धिविनायकनगर, वाघजाईनगर, हनुमाननगर येथील पाणी समस्या उग्र असून रहिवाशांना विकतचे पाणी घ्यावे लागते. सामान्य नागरिकांना दुचाकीवर भांडी घेऊन पाण्यासाठी फिरावे लागते. त्यामुळे टॅंकरचा धंदा तेजीत चालला असून, पालिकेची पाणी टॅंकर व्यवस्था अपुरी आहे. टॅंकर येताच नागरिकांची पाण्यासाठी झुंबड उडताना दिसते.

खडकी - व्हॉल तुटल्याने पाणी अनियमित 
येथील परिसरात होळकर व चतुःशृंगी जलकेंद्रातून पाणीपुरवठा केला जातो. वाकडेवाडी, नतावाडी, पीएमसी कॉलनी, मुळारोड, साप्रस, खडकी बाजार, पोलिस लाइन, दर्गावसाहत, महादेववाडी, मानाजी बाग, सुरती मोहल्ला, रेंजहिल्स आदी भागांत अंदाजे सकाळी दोन ते तीन तास पाणीपुरवठा केला जातो. दोन ते तीन दिवस व्हॉल तुटल्याने येथील पाणीपुरवठा विस्कळित झाला होता. 

नऱ्हे - पाण्यासाठी वणवण
नऱ्हेमध्ये सामान्य नागरिकांना सायकली, दुचाकीवर भांडी घेऊन पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. त्यामुळे या भागात टॅंकरचा धंदा तेजीत चालला असून, त्यांच्याकडून नागरिकांची अडवणूक होत आहे. तसेच पाण्याचे बॅरलचा व्यवसायही तेजीत सुरू असल्याचे नागरिकांनी सांगितले. येथील बऱ्याचशा सोसायट्यांचा पाण्याच्या टॅंकरसाठी महिन्याकाठी खर्च लाख, दीड लाखाच्या घरात जातो. 

वडगावशेरी - टॅंकरच्या पाण्यावर लाखो रुपये खर्च
खराडी, वडगाव शेरी, लोहगाव, खांदवेनगर भागात सध्या नागरिकांना मोठ्या पाणीटंचाईचा सामना करावा लागतो आहे. पाणीवाटप यंत्रणेचे नियोजन विस्कळित झाले असून, पाणीपुरवठा अधिकारी मात्र उडवाउडवीची उत्तरे देतात. काही भागांत मध्यरात्री पाणीपुरवठा केला जात आहे. त्यामुळे नागरिकांच्या झोपा उडाल्या आहेत. अनियमित आणि अपुरा पाणीपुरवठा यामुळे सोसायट्यांपासून ते वस्तीपातळीपर्यंतचे नागरिक हैराण झाले आहेत. अनेक सोसायट्यांना लाखो रुपयांचे पाण्याचे टॅंकर विकत घ्यावे लागत आहेत. पाणीटंचाईविरोधात अनेकदा आंदोलन करूनही पाणीटंचाई कायमच आहे.   

(संकलन - अन्वर मोमीन, बंडू दातीर, कैलास गावडे, प्रयागा होगे, सचिन कोळी, आरती मेस्त्री, जितेंद्र मैड, विनायक बेदरकर, प्रणिता मारणे, विठ्ठल तांबे, नितीन बिबवे, बाबा तारे, महादेव पवार, दत्तत्रेय  पवार, अजित घस्ते. )


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal corporation and Water Resources of the controversial