अर्थसंकल्पातील योजना कागदावरच

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 जानेवारी 2020

महापालिकेचा २०२०-२१चा अर्थसंकल्प आयुक्त सौरभ राव येत्या शुक्रवारी सर्वसाधारण सभेत मांडणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर आधीच्या अर्थसंकल्पाच्या आढाव्यातून ही बाब निदर्शनास आली आहे.

पुणे - महापालिकेच्या आधीच्या अर्थसंकल्पात सत्ताधारी भाजपने घोषणा केलेल्या अनेक प्रकल्पांच्या योजना कागदावरच ठेवत प्रशासनाने राजकीय योजनांपेक्षा आपला अजेंडा रेटल्याचे स्पष्ट झाले आहे. सत्ताधाऱ्यांनी सुचविलेल्या वैद्यकीय महाविद्यालय, बालगंधर्व रंगमंदिर पुनर्बांधणी, शिवसृष्टी, वाहतूक, आरोग्याच्या योजना आर्थिक तरतुदीमुळे पुढे सरकलेल्या नाहीत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

महापालिकेचा २०२०-२१चा अर्थसंकल्प आयुक्त सौरभ राव येत्या शुक्रवारी सर्वसाधारण सभेत मांडणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर आधीच्या अर्थसंकल्पाच्या आढाव्यातून ही बाब निदर्शनास आली आहे.

अर्थसंकल्पात घोषणा झालेल्या प्रकल्पांसाठी निधी असूनही त्यांच्या अंमलबजावणीसाठी प्रशासकीय पुढाकारच नसल्याने त्या खोळंबल्या आहेत. सत्ताधारी भाजपने आपल्या पहिल्यावहिल्या (२०१७-१८) अर्थसंकल्पात पक्षीय अजेंडा योजनांवर भर दिला; त्यातून शिक्षण, आरोग्य, वाहतूक आणि अन्य पायाभूत सेवासुविधा जाहीर करण्यात आल्या. त्यासाठी निधीची जुळवाजुळव केली. त्यानंतर वर्षभरात अंमलबजावणी करून पुणेकरांच्या रोजच्या जगण्यात बदल करण्याचे आश्‍वासन देण्यात आले. परंतु, उत्पन्नाशी ताळमेळ न घालता स्थायी समितीने मांडलेल्या अशा योजनांच्या अंमलबजावणीचा वेग प्रशासनाने मर्यादित ठेवला. या योजनांचा नावांपुरता उल्लेख नव्या अर्थसंकल्पात करण्यात आला. त्यामुळे त्या अमलात येण्याची आशा तिसऱ्या वर्षीही धूसर झाल्याने अर्थसंकल्पाची अंमलबजावणी प्राधान्यक्रम आणि प्रत्यक्ष वस्तुस्थिती वेगळी आहे.

महत्त्वाच्या  योजनांची प्रगती 
    भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय - ट्रस्ट स्थापन 
    पंडित दीनदयाळ उपाध्याय अपघात विमा योजना - वर्षभरात केवळ २५ लाभार्थी
    बालगंधर्व रंगमंदिर पुनर्बांधणी - पाहणी आराखडे तयार (नकाशे) 
    नदीकाठ सुधारणा प्रकल्प - कंपनी स्थापन
    नव्या गावांत विकासकामे : दोन वर्षांत फक्त शंभर कोटी रुपयांची कामे
    नगर रस्ता वाहतूक आराखडा : पाहणी
    ई-लर्निंग, ई-ग्रंथालय, शाळांचे मूल्यांकन, डॉ. अबुल कलाम वाचन प्रेरणा, स्मारके

दहा वर्षांत दहा हजार कोटींची तूट 
उत्पन्नाचे नवे स्रोत शोधून शहराच्या विकासासाठी तिजोरीतील खडखडाट संपविण्याच्या घोषणा सत्ताधारी-अधिकारी करीत आले आहेत. प्रत्यक्षात मात्र जमा-खर्चाच्या आकड्यांचा  अंदाज न जुळविता आयुक्त आणि स्थायी समितीने मांडलेल्या अर्थसंकल्पांचा फुगवटा उघड झाला आहे. दहा वर्षांत अर्थसंकल्पात दहा हजार कोटींची तूट आली आहे.

पुणेकरांना रोजच्या जगण्यासाठी आवश्‍यक असलेल्या प्रकल्पांना प्राधान्य आहे. त्यानुसार ते मार्गी लावले असून, अर्थसंकल्पातील बहुतांश योजना अंमलबजावणीच्या पातळीवर वेगाने पुढे सरकल्या आहेत. 
- मुरलीधर मोहोळ, महापौर

पायाभूत सुविधा ठरावीक कालावधीत उभारण्यात येत असून, विकासाचा प्राधान्यक्रम ठरवून तो पूर्णपणे राबविण्यात येत आहे. वाहतूक, आरोग्य आणि शिक्षण या बाबी लोकांना सहजरीत्या उपलब्ध होत आहेत. 
- सौरभ राव, आयुक्त, महापालिका


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Municipal Corporation Budget 2020-21