पुणे महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे महावितरणचे 'या' परिसरातील काम रखडले

MH.jpg
MH.jpg

पुणे : जुनाट वीजवाहिनीमध्ये सातत्याने बिघाड होत असल्याने सहकारनगर एक, स्वारगेट, जनता वसाहत व अरण्येश्वरला पर्यायी वीज पुरवठा सुविधा निर्माण करण्याचे काम महापालिकेच्या परवानगी अभावी रखडले आहे. विशेष म्हणजे महावितरणकडून शुल्क भरून देखील महापालिकेकडे परवानगी देण्यास अद्याप वेळ मिळालेला नाही. त्यामुळे गेल्या तीन महिन्यापांसून हे काम राखडले आहे. त्यामुळे अत्यावश्‍यक पर्यायी वीजपुरवठ्याचे सुरु केलेले काम देखील महावितरणकडून थांबविण्यात आले आहे. 

पर्वती विभाग अंतर्गत जुनी पर्वती उपकेंद्रातून निघणाऱ्या अरण्येश्वर 22 केव्ही वाहिनीद्वारे सहकारनगर एक, अरण्येश्वर परिसर तसेच स्वारगेट व जनता वसाहतीच्या काही भागातील वीजग्राहकांना वीजपुरवठा केला जातो. काही ठिकाणी ओव्हरहेड तर काही ठिकाणी भूमिगत असलेल्या अतिशय जुनाट वीजवाहिनीमध्ये बिघाड झाल्यास पर्यायी वीजपुरवठ्याची सोय सध्या उपलब्ध नाही. त्यातच वाहिनीचा काही भाग हा वनविभागाच्या हद्दीतून तसेच कॅनॉलच्या कडेनेही जात असल्याने तांत्रिक बिघाड झाल्यास दुरुस्तीसाठी मोठा वेळ लागतो.

विशेषत: पावसाळ्यात या वाहिनीमध्ये बऱ्याच वेळा बिघाड होतो. 
या पार्श्वभूमिवर गुलटेकडी उपकेंद्रातून एक किलोमीटर लांबीच्या नवीन भूमिगत वाहिनीद्वारे अरण्येश्वर वाहिनीला पर्यायी वीजपुरवठा देण्याचा प्रस्ताव महावितरणकडून मंजूर करण्यात आला आहे. महावितरणच्या एक किलोमीटर भूमिगत वाहिनीच्या खोदकामासाठी पुणे महानगरपालिकेने 31 मार्च 2020 पर्यंत मंजुरी दिली होती. महावितरणकडून खोदकामासाठी नियमानुसार रक्कम भरण्यात आली आहे. मात्र 23 मार्चपासून लॉकडाऊन सुरु झाल्याने सर्वच काम ठप्प झाले. त्यातच मनुष्यबळ उपलब्ध न झाल्याने महानगरपालिकेने दिलेली मुदत उलटून गेली. त्यानंतर एप्रिलमध्ये महावितरणकडून खोदकामाची मुदत वाढवून देण्याचे लेखी पत्र महानगरपालिकेकडे पाठविण्यात आले. मात्र अद्यापही कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. 

दरम्यान, जून व जुलैमधील मुसळधार पाऊस, झाडाच्या फांद्या पडल्याने तसेच पावसाचे पाणी शिरल्यामुळे अनेकदा अरण्येश्वर वीजवाहिनी अनेक ठिकाणी नादुरुस्त झाली. परिणामी हजारो ग्राहकांना खंडित वीजपुरवठ्याचा त्रास सहन करावा लागला. विशेष म्हणजे या वाहिनीवरील वीजपुरवठ्यामध्ये काही कोरोना प्रतिबंधित क्षेत्रांचाही समावेश आहे. तसेच इतर परिसरात वर्क फ्रॉम होम सुरु असल्याने नागरिकांचा रोष व तक्रारी वाढत गेल्या. त्यामुळे महावितरणने अत्यावश्‍यक सेवेसाठी जुन्या परवानगीच्या आधारे पर्यायी वीजपुरवठ्याचे काम सुरु केले. भूमिगत वाहिनीचे एक हजार पैकी 950 मीटरचे काम पूर्ण झाले आहे. मात्र अवघ्या 50 मीटरचे काम शिल्लक असताना महानगरपालिकेकडून हे काम थांबविण्यात आले आहे. पूर्वी रितसर परवानगी घेतली असताना तसेच नियमाप्रमाणे आवश्‍यक रकमेचा भरणा केला असताना, खोदकामाची मुदत वाढवून देण्याचे पत्र दिले असतानाही पर्यायी वीजपुरवठ्याचे काम थांबविण्यात आले आहे. त्यामुळे सद्यस्थितीत अरण्येश्वर वीजवाहिनीला पर्यायी वीजपुरवठा उपलब्ध करून देण्याचे काम देखील रखडले असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com