पुणे - पुणे महापालिकेने बावधन येथील एका सोसायटीला तब्बल २४ लाख रुपयांचे पाणी पट्टीचे बिल पाठविल्याने या सोसायटीचे धाबे दणाणले आहेत. महापालिकेकडे मीटरचे रीडिंग घेण्यासाठी कर्मचारी कमी असल्याने दर दोन महिन्याचे बिल पाठविणे आवश्यक असताना सोसायटीला वर्षभराचे बिल एकाच वेळी पाठविण्यात आले आहे. महापालिकेकडे संपूर्ण शहरासाठी केवळ २४ मिटर रीडर आहेत, त्यामुळे ते रीडिंग उशिरा घेतात असे सांगत प्रशासनाने हात झटकले आहेत.